/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> उजनी धरणावरील प्रस्तावित AI डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांविरोधात शेतकरी, वारकरी व मच्छिमारांचा एल्गार!

Hot Posts

उजनी धरणावरील प्रस्तावित AI डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांविरोधात शेतकरी, वारकरी व मच्छिमारांचा एल्गार!

 

उजनी धरणावरील प्रस्तावित AI डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांविरोधात शेतकरी, वारकरी व मच्छिमारांचा एल्गार!

रांजणी चौकात पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको; चार जिल्ह्यांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रकल्प रेटल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा

सोलापुर  (प्रतिनिधी) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर, सोलर प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प (SMR) आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांविरोधात पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकरी, वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले आहेत. या प्रस्तावित प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावरील रांजणी चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून शासनाच्या धोरणांविरोधात नागरिकांमधील तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधताना प्रस्तावित प्रकल्पांचे शेती, पर्यावरण, जलसंपत्ती आणि मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणारे संभाव्य दुष्परिणाम गंभीर असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. उजनी धरण हे परिसरातील शेती, पिण्याचे पाणी आणि मत्स्यव्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असणारे प्रकल्प येथे उभारल्यास भविष्यात स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता आंदोलकांनी व्यक्त केली.

विशेषतः प्रस्तावित AI डेटा सेंटरसाठी तब्बल ९ टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाणार असेल, तर त्याचा थेट परिणाम शेती आणि स्थानिक जलव्यवस्थेवर होऊ शकतो. या प्रकल्पांमधून स्थानिक पातळीवर अपेक्षित रोजगारनिर्मिती होणार नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. एकीकडे शेती आणि पारंपरिक व्यवसाय धोक्यात येण्याची भीती असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारे सेमीकंडक्टरसारखे उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली.


प्रदूषणकारी प्रकल्प नकोत, शेती आणि रोजगाराला प्राधान्य द्या!

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांचे परिणाम केवळ आजच्या पिढीपुरते मर्यादित राहणार नसून भविष्यातील अनेक पिढ्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. शेतकऱ्यांची शेती, मच्छिमारांचा पारंपरिक व्यवसाय, वारकरी संप्रदायाच्या भावना आणि परिसरातील पर्यावरण यांचा विचार न करता कोणताही प्रकल्प लादू नये, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादातून चार जिल्ह्यांतील नागरिकांचा या विषयावरील रोष स्पष्टपणे दिसून आला. शासनाने जनतेच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जनसुनावणीशिवाय प्रकल्प नाही, प्रशासनाचे आश्वासन

आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या वतीने जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प राबविण्यात येणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून शासनाने भविष्यात हे प्रकल्प जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही मोठे आणि व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

दिग्गज नेते, लोकप्रतिनिधी आणि वारकरी संप्रदायाचा सहभाग

या रास्ता रोको आंदोलनाला ज्येष्ठ नेते महादेव जानकर साहेब, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नारायणआबा पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, आमदार अभिजित पाटील, नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील, अनिकेत देशमुख, शितलदेवी ताई, संजयबाबा कोकाटे, सुभाष आबा गुळवे, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, महारुद्र पाटील, दिग्विजय बागल, नंदकुमार नगरे, सिताराम नगरे, निलेश देवकर, ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

याशिवाय वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकरी तसेच स्थानिक मच्छिमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत या आंदोलनाने शासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आता शासन या जनआक्रोशाची दखल घेऊन प्रस्तावित प्रकल्पांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>