/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> अणदुर : मृत्यूच्या दारातून परतलेली ‘चिंगारी’ आज डॉक्टर! संघर्ष, जिद्द आणि आई-वडिलांच्या कष्टांना यशाचा सुवर्णस्पर्श-BAMS Degree

Hot Posts

अणदुर : मृत्यूच्या दारातून परतलेली ‘चिंगारी’ आज डॉक्टर! संघर्ष, जिद्द आणि आई-वडिलांच्या कष्टांना यशाचा सुवर्णस्पर्श-BAMS Degree

 

अणदुर :मृत्यूच्या दारातून परतलेली ‘चिंगारी’ आज डॉक्टर! संघर्ष, जिद्द आणि आई-वडिलांच्या कष्टांना यशाचा सुवर्णस्पर्श-BAMS Degree

लोककलावंत वडिलांची मुलगी अभिलाषा दयानंद काळुंके BAMS परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; १६६७ गुणांसह ६५.३७ टक्के मिळवत उज्ज्वल यश संपादन

प्रतिकूल परिस्थिती, गरिबीचे चटके आणि बालपणी मृत्यूला दिलेली हुलकावणी... अशा अनेक संकटांवर मात करत अभिलाषा उर्फ ‘चिंगारी’ दयानंद काळुंके हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातून BAMS पदवीच्या अंतिम परीक्षेत १६६७ गुण आणि ६५.३७ टक्के मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या अभिलाषाच्या यशाने तिच्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. लोककलेच्या माध्यमातून संसाराचा गाडा ओढणारे वडील आणि शिलाई मशीनवर कष्ट करणाऱ्या आईच्या स्वप्नांना आज खऱ्या अर्थाने सुवर्णस्पर्श झाला आहे.

काही यशोगाथा केवळ गुणपत्रिकेपुरत्या मर्यादित नसतात, तर त्या संघर्ष, त्याग, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी इतिहास घडवतात. अभिलाषा उर्फ चिंगारी काळुंके हिची कहाणीही अशीच हृदयस्पर्शी आहे. बालपणी मृत्यूच्या दारातून सुखरूप परतलेली ही चिमुरडी आज डॉक्टर बनून आपल्या कुटुंबासह परिसराचा अभिमान ठरली आहे.

बालपणीच मृत्यूशी सामना; नियतीने दिले नवे आयुष्य!

अभिलाषा चौथ्या इयत्तेत शिकत असताना तिच्या आयुष्यात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. वत्सलानगरकडे जाणारा रस्ता ओलांडत असताना महामार्गाच्या मध्यभागी तिला ठेच लागली आणि ती रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी हैदराबादच्या दिशेने जाणारा भरधाव ट्रक तिच्या अंगावरून गेला. ट्रकच्या दोन्ही बाजूंच्या टायरखाली ती सापडल्याची घटना घडली.

या अपघाताची वार्ता पसरताच परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली. चिमुरडी चिंगारीचा मृत्यू झाल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. एका बापाच्या काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एवढ्या भीषण अपघातातूनही अभिलाषा आश्चर्यकारकरीत्या सुखरूप बचावली. तिला किरकोळ दुखापत झाली. 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना होती.

त्या दिवशी मृत्यूला हुलकावणी देणारी ही चिमुरडी भविष्यात डॉक्टर होऊन अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करेल, याची त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती.

वडील लोककलावंत, आई शिलाईकाम करून संसाराचा गाडा ओढणारी!

अभिलाषाचे बालपण मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू दिली नाही.

तिचे वडील दयानंद काळुंके हे लोककलावंत आहेत. कधी वासुदेव, कधी ज्योतिषी, कधी पोतराज, तर कधी नकलाकार अशा विविध भूमिका साकारत ते गावोगावी फिरून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करीत असत. या लोककलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा ओढत होते. त्याच उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागवला जात होता.

दुसरीकडे आई शिलाई मशीनवर कपडे शिवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होती. शिलाई मशीनच्या प्रत्येक टाक्यासोबत ती आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न विणत होती. स्वतःच्या सुखाचा विचार बाजूला ठेवून या मायबापाने आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

आज दोन्ही मुले डॉक्टर झाल्याने त्यांच्या अनेक वर्षांच्या कष्टांचे आणि त्यागाचे सार्थक झाले आहे.

पहिलीपासूनच गुणवत्तेची चमक; पुण्यात वैद्यकीय शिक्षणाची संधी

आई-वडिलांचे कष्ट आणि त्यांची स्वप्ने अभिलाषाने कायम मनात जपली. पहिलीपासून दहावीपर्यंत तिने वर्गातील गुणवत्तेचा क्रम कायम राखत अभ्यासात आपली चमक दाखवली. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण ग्लोबल व्हिलेज, बोरामणी येथे पूर्ण केले. शालेय शिक्षणासोबतच तिने NEET परीक्षेची तयारी केली.

वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तिने मेहनत घेतली आणि पुण्यातील नामांकित टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

मोठ्या भावाने डॉक्टर होऊन कुटुंबासाठी आशेचा नवा मार्ग निर्माण केला होता. भावाची प्रेरणा, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि स्वतःची अभ्यासातील चिकाटी या बळावर अभिलाषाने वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. या प्रवासात तिने सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर तिन्ही वर्षांत विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवत महाविद्यालयाचा गौरव वाढवला.

BAMS अंतिम परीक्षेत ६५.३७ टक्के; प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

अखेर तिच्या मेहनतीला यशाचे फळ मिळाले. BAMS पदवीच्या अंतिम विद्यापीठीय परीक्षेत अभिलाषाने तब्बल १६६७ गुण मिळवत ६५.३७ टक्क्यांसह प्रथम श्रेणीत यश संपादन केले.

हे यश केवळ एका विद्यार्थिनीच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक नाही, तर लोककलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर संसार चालवणाऱ्या वडिलांच्या घामाचे आणि शिलाई मशीनवर कष्ट करणाऱ्या आईच्या त्यागाचे फलित आहे.

ज्या घरात रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत होता, त्याच घरातून आज डॉक्टर घडली आहे. वडिलांच्या कलेला आणि आईच्या कष्टांना अभिलाषाने आपल्या यशातून अनोखी मानवंदना दिली आहे.

स्त्रीरोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ध्येय

डॉक्टर झाल्यानंतरही अभिलाषाचा प्रवास थांबलेला नाही. भविष्यात स्त्रीरोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर काम करण्याची तिची इच्छा आहे. वैद्यकीय ज्ञानाच्या माध्यमातून समाजातील गरजू महिलांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय तिने ठेवले आहे.

चिंगारीचे यश म्हणजे संघर्षशील आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता!

कधीकाळी महामार्गावर मृत्यूच्या सावटाखाली सापडलेली चिमुरडी आज ज्ञानाच्या महामार्गावर आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहे. वडिलांच्या डोक्यावरील वासुदेवाची टोपी, लोककलेच्या माध्यमातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न आणि आईच्या शिलाई मशीनचा अखंड आवाज... या सगळ्यांतून उभे राहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे.

अभिलाषाच्या या यशाबद्दल तिचे आई-वडील, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही केवळ ‘चिंगारी’च्या डॉक्टर होण्याची कहाणी नाही; तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर स्वप्नांना गवसणी घालता येते, याचा जिवंत संदेश आहे.

आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करणारी ही चिंगारी भविष्यात ज्ञानाची ज्योत बनून असंख्य रुग्णांच्या आयुष्यात आरोग्याचा आणि आशेचा प्रकाश निर्माण करो, हीच सदिच्छा!

संघर्षाला सलाम... जिद्दीला मानाचा मुजरा... आणि डॉक्टर अभिलाषा उर्फ चिंगारी काळुंके हिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>