Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या प्रश्नाना न्याय देण्याची सरकारला सुबुद्धी दे!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे तुळजाभवानीचरणी साकडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानची जगदंबेच्या दरबारात सांगता

शेतकऱ्यांच्या प्रश्नाना न्याय देण्याची सरकारला सुबुद्धी दे!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे तुळजाभवानीचरणी साकडे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानची जगदंबेच्या दरबारात सांगता



तुळजापूर-राज्यात आज शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही, सोयाबीनला आणि कापसाला भाव नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. म्हणून शेतकऱ्यांचे मरण थांबविण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी मिळावी याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पावन रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. धाराशिव जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कालभैरवनाथ सोनारी ते श्रीक्षेत्र तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान राबविले.  या अभियानाची तुळजाभवानी चरणी सांगता करताना  शेतकऱ्यांच्या प्रश्नाना न्याय देण्याची सरकारला सुबुद्धी दे असे साकडे आम्ही घालत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील यांनी केले.

धाराशिव जिल्ह्यात 28 जुलै पासून सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानची शुक्रवार, 4 ऑगस्ट  रोजी कुलस्वामिनी जगदंबेच्या दरबारात तुळजापूर येथे महाद्वारसमोर सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीचे प्रकाश पोपळे, युवती महिला आघाडीच्या अध्यक्ष पूजाताई मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रा.डॉ.बिभीषण भैरट, मराठवाडा युवा अध्यक्ष गोरख भोरे, ओबीसी सेलचे राजाभाऊ हाके, तालुकाध्यक्ष भोजने, नेताजी जमदाडे,  जनार्दन पाटील, प्रशांत डिक्कर, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, केंद आणि राज्यातील सरकारचे नेते परदेश दौरा आणि सत्तेसाठी साठमारी करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त घोषणा करण्यात सरकार मशगुल आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून हे अभियान राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी जिल्ह्यात अभियानच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात केलेल्या जनजागृतीच्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. अभियानच्या समारोपप्रसंगी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत समुद्रे,  जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी  यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रबोधनपर गीतांमधून मांडल्या शेतकर्‍यांच्या व्यथा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानात कला पथकामार्फत प्रबोधनपर गीतांद्वारे जनजागृती करण्यात आली होती. समारोप कार्यक्रमातही गायक नंदकुमार कदम, गीतकार प्रदीप पाटील, संबळ वादक अशोक पाटील, सिराज पठाण यांनी संबळाच्या कडकडाटात प्रबोधनपर गाणी सादर करून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या.


जिल्हाभरात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती

श्रीक्षेत्र काळभैरवनाथ मंदिरातून 28 जुलै रोजी सुरू झालेले हे अभियान 29 जुलै रोजी भूम, 30 जुलै वाशी, 31 जुलै कळंब आणि त्यानंतर मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी धाराशिव, 2 ऑगस्ट रोजी लोहारा, 3 ऑगस्ट उमरगा तालुक्याचा प्रवास करत शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या श्रीक्षेत्र तुळजापुरात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते महाआरती करून अभियानची सांगता करण्यात आली. अभियानादरम्यान जिल्हाभरात गावोगावी जाऊन शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments