दीपावली प्रारंभ वसुबारस ,वत्सबारस तथा द्वितिया.
शब्द संकलन : सहशिक्षक श्री.पंकज राजेंद्र कासार - काटकर.
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.धाराशिव
=================================
भारतीय माणुस तसा उत्सव प्रिय.सण,उत्सव हे त्याच्या नसानसात भिनलेले.त्यामुळे कोणतेही उत्सव हे भारतात विशेषतः मराठी कुंटुंबात आवडीने,उत्साहाने,स्नेहाने आणि परंपरेने साजरे होतात.आता दिवाळीचा चा हा उत्सवच घ्या ना.दिवाळीची सुरुवात होते वसुबारसेने.वसुबारस याला गायगुरांची बारस असे म्हणतात..दिवाळी सहा दिवसांचा सण असतो.वसुबारस पहिला दिवस,दुसरा धनत्रयोदशी,तिसरा नरकचतुर्दशी,चौथा अमवस्या लक्ष्मीपुजन,पाचवा दिवाळी पाडवा,सहावा भाऊबीज.असे सहा दिवस हा सण साजरा होतो.तस तर हा सण पंधरा दिवस ही साजरा केला जातो.वसुबारसे पासुन कार्तिक पौर्णिमेपर्यत्त हा सण साजरा केला जातो.
वसुबारस या दिवशी गाय आणि वासरांचे पुजन केले जाते.त्यांच्या गळ्यांत झेंडु फुलांचे हार घातले जातात.त्यांना सजवले जाते.त्यांची पुजा केली जाते.गंध,अक्षता,फुले वाहुन औक्षण केले जाते.गोड पोळीचा,साखरपोळी गुळपोळीचा नैवद्य खायला दिला जातो.खर तर आज जुने वाडे नाहीत.पंचकोणी,चौकोणी,त्रिकोणी घरांची जागा प्लॅट संस्कृतीने घेतली.वन बिएचके, टु बिएचके च्या जमान्यात जिथे आई वडिलांना घरात रुम नसते,जागा नसते तिथ गाय गुरांचे,वासरांचे गोठे कुठे असणार.अरे रे ?गोठे हा शब्द तरी आजच्या पिढीला कसा समजेल?जिथं गायी,वासरे,बैल,पाळीव जनावरे बांधली जात त्यांना गोठे,काही भागात कोठे तर काही भागात आखाडे असे म्हणतात.पुर्वी घराचे वाड्यांच्या पुढे मोठे मोठे चांगले चार गुंठे, पाच गुंठे,जागेत असे गोठे असत.म्हणजे साधरण चार हजार आठशे स्केअर फुट.पण हल्ली वाडे नाहीत,धाब्यांची माळवदांची घरे नाहीत आणि गोठे ही नाहीत.जुन्या आठवणी,जुनी माणसे आणि परंपरा,संस्कृती आपण अडगळीत टाकलीत.वासुबारसेलाच नाही तर दररोज ग्रामीण भागात गाईला तव्यावर होणारी पहिली पोळी जिला गोग्रास म्हणजे गाईचा घास म्हणतात तो दिला जात असे.माझी आई आजही पहिली पोळी गाईसाठी बाजुला ठेवते.आज आमच्या घरी गाय नाही याची खंत वाटते.पण एक माय गायीसाठी रोज पहिली पोळी भाकरी,चपाती ग्रोगास म्हणुन बाजुला ठेवते आणि गाय दारात आल्यावर ती खावु घालते.मला माहित नाही यातुन तिला कोणत पुण्य मिळत.पण गाईला घास खावु घालताना तिच्या चेहर्यावर समाधान फुलत ना ते अधिक आनंद देवुन जात.
हल्ली गायीच दिसत नाही आणि आजच्या पिढीला अशी पुजा करायची असेल तर चित्रात गाय वासरु दाखवुन पुजा करावी लागेल.किंवा गाईची वासरांची मातीची मुर्ती ठेवुन पुजा करावी लागेल.दुर्देव आहे पण सत्य आहे.आपण गोपुजक आहोत हे आज आपण पुर्ण विसरलो.
गायीचे शेण खत म्हणुन गायीचे मलमुत्र अनेक विकारावर औषध संजिवनी म्हणुन तिचे दुध,गाईच्या दुधाचे दही,तुप प्रत्येक गोष्टीचे तितकेच अमुल्य महत्व आहे.पण हे समजत असुन ही आपण काही करु शकत नाही.गोठ्यात गाय आणि घरात माय हेच आपले वैभव आहे.
आमच्या बालपणी आम्ही या उत्सवात सहभागी होत असु.वसुबारसेलाच आई पहाटे उठायची,अंगण साफसफाई करुन गोठा सफाई करायची.दारात हिरव्यागार शेणाचा सडा पडायचा.त्यावर सुंदर रांगोळी घातली जायची.पहाटेच्या मंद गारव्यात दिवे लख्ख प्रज्वलित व्हायचे.आकाशकंदिल लावले जायचे.आई गायीच्या शेणापासुन बाहुल्या घालायची.या खुप सार्या बाहुल्यांना गवळणी असे म्हणत.खर तर गवळणी म्हणजे श्रीकृष्णांच्या राज्यात दही,दुध,तुप,लोणी,विकणार्या स्रीयांना गवळणी म्हणत.या गवळणी शेणाच्या रुपाने बाहुल्या करुन त्यांचा खेळ अंगणी सजवण्याचे काम ग्रामीण स्रीया करत.खर तर हा धार्मिक विधी जरी असला तरी हा एक मनोरंजनपर खेळ होता.सासरी होणार्या सासरवास,छळ,त्रास,वेदना,यातुन माहेरी दिवाळी आलेल्या मुली,माहेरवाशिणी या गवळणीत मांडायच्या.त्यात,सासु,सासरा,दिर,नंणद,वांजत्री,पांडव,श्रीकृष्ण,पेंद्या,गुराखी,गोवर्धन पर्वत हे सर्व शेणा पासुन बाहुल्या करुन स्रीयां मांडत.यातुन त्यांच मनोरंजन तर होई,पण सासरी होणार्या वेदनांना माहेरच्या अंगणात विसावा मिळायचा,थोडा भावनांना वाट ही मोकळी मिळायची.किती सुंदर संस्कृती आहे मराठी.स्रीयांच्या वेदना,खंत,त्रास या खेळातुन कामातुन बाहेर यायच्या.या गवळण्याच्यावर शेणाच्या टोपल्या करुन त्यावर दही टाकल ज्यायच,रंगबेरंगी फुले,झेंडुची,जास्वंद फुले घालुन या गवळी सजवत.आम्ही लहान भांवंड या गवळणी घालताना तिथच बसुन आनंद घ्यायचो.
फराळीचे पदार्थ घरीच बनवले जात.त्याला चव होती.आईच्या हाताचा सुगंध,तिच्या कष्टाची चव फराळाला यायची.हल्ली बाजारात विविध गोड पदार्थ,फराळ मिळतात.पण त्यात ना गोडवा असतो,ना प्रेम.ना वात्सल्य,ना आईची ममता,
हल्लीची दिवाळी म्हणजे संपत्तीचे, श्रीमंतीचे बेगडी प्रदर्शन आहे.बिएचके संस्कृतीत,लाखोचे फ्लॅट,लाखोच्या गाड्या,चकचकित,माॅल्स,रेडिमेड फराळ,रेडिमेड कंदिल,चिनी मातीचे दिवे,फटाके,फॅशनच्या नावाने अंग उघडे पाडणारे बिभित्सक कपडे,अत्तर,हजारो रुपयांची उधळ्ळपट्टी त्यातुन साजरा होणारा दिवाळी सण.सगळ विकृत वाटत.त्यात ना गोडवा,ना प्रेम,ना स्नेह.जगण चकचकित,पाॅश झाल.माणस ही पाॅश झाली.पण त्यातली मन मात्र आजही काळवंडलेली आहेत.प्रचंड द्वेष,मत्सर,वेदनेने आजही ही मन भरलेली आहेत.ही मन जेंव्हा चकचकित पाॅश होतील तेंव्हा खर्या अर्थाने दिवाळी दिमाखदार होईल.तुर्तास आभासी या जगात मुखवटे घालुन दिवाळ सणात प्रकाश शोधणारी माणस आज तरी काळवंडलेली आहेत हेच खर
आजच्या दिवाळीच्या प्रथम दिनी चला गाईबरोबर माईचं (आई) च ही पुजन करुन खरे धनवान बनु याच शुभकामना.
शुभ दिपावली
====================
© आपलाच गुरुजी
श्री.पंकज राजेंद्र कासार - काटकर.
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.धाराशिव
मो.क्र.९७६४५६१८८१
0 Comments