भुम : वालवड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत चोरी ; 20 हजारांची रोकड लंपास-Bank Robbery Bhum Crime News
धाराशिव (प्रतिनिधी) –भुम तालुक्यातील वालवड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्याने चोरी करून 20 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 5.30 वा. ते दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.05 वा. या दरम्यान ही घटना घडली. वालवड येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या चॅनल गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेत ठेवलेली सुमारे 20,000 रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली.
याबाबत शाखाधिकारी बिभीषण ज्ञानोबा कोकाटे (वय 58 वर्षे, रा. गणेगाव ता. भुम जि. धाराशिव) यांनी दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रथम खबर दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305, 324(4) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील बँक शाखांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास भुम पोलीस ठाणे करीत आहे.

0 Comments