अतिक्रमण कारवाईदरम्यान स्वच्छता निरीक्षकाला मारहाण; शासकीय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा-Tuljapur Police Station Crime News
धाराशिव : शहरातील जुने बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान नगरपरिषदेच्या स्वच्छता निरीक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली असून, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैजीनाथ शामराव सुरवसे (रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याने गुरुवारी (दि. ५ मार्च २०२६) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जुने बसस्थानक पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडवली.
त्या वेळी फिर्यादी दत्तात्रय रामभाऊ साळुंखे (वय ५८, व्यवसाय – स्वच्छता निरीक्षक, नगरपरिषद तुळजापूर, रा. विश्वासनगर तुळजापूर) हे नगरपरिषदेच्या सुमारे ९० कर्मचाऱ्यांसह त्या परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम करत होते. यावेळी आरोपी वैजीनाथ सुरवसे घटनास्थळी आला आणि “तुम्ही कोणाच्या आदेशाने अतिक्रमण काढता?” असे म्हणत साळुंखे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने लाथाबुक्यांनी मारहाण करून “तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दत्तात्रय साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी वैजीनाथ सुरवसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 115(2), 352, 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

0 Comments