🔴 तुळजापूर तालुक्यात अत्याचाराच्या दोन घटना :लग्नाचे आमिष व धमकी देत दोन महिलांवर लैंगिक अत्याचार; दोन वेगवेगळे गुन्हे दाखल-Naldurg Police Station Crime News
📍 धाराशिव | प्रतिनिधी
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या घटनेतील दोन महिलांवरील अत्याचाराच्या दोन गंभीर घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, एका गावातील 27 वर्षीय महिलेवर फेब्रुवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपी महिलेचा विश्वास संपादन करून तिला शेतामध्ये घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पीडित महिलेने 1 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(एच)(एम), 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, 21 वर्षीय महिलेवर 31 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने तिच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने पीडितेला “कोणास सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करीन” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणीही पीडितेने 1 एप्रिल 2026 रोजी तक्रार दाखल केली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 115(2), 351(2)(4), 352 तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

0 Comments