येरमाळा येथे पोलिसांवर धक्काबुक्की; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल-Yermala Crime News Daily Update
धाराशिव : येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त येरमाळा येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या बसस्थानक परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असताना पोलिसांशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये सचिन श्रीमंत चव्हाण, अमोल श्रीमंत चव्हाण (कारचालक), राजश्री चंद्रकांत पवार, स्वामी सचिन चव्हाण, नमिता अमोल चव्हाण, महानंदा श्रीमंत चव्हाण (सर्व रा. गुंजेवाडी, ता. जि. धाराशिव) तसेच सुनिता कृष्णा जाधव (रा. प्रकाश नगर, लातूर) यांचा समावेश आहे.
दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास लहुजी शक्ती सेना चौक, येरमाळा येथे येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालय धाराशिव येथील नरसिंग राजेंद्र गायकवाड (वय २६) हे आपल्या सहकाऱ्यांसह वाहतूक नियमनाचे शासकीय कर्तव्य बजावत होते.
यावेळी अमोल चव्हाण यांनी आपल्या ताब्यातील वाहन पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पुढे नेले व त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. एवढेच नव्हे तर त्यांनी वाहन थेट फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, इतर आरोपींनीही जाणीवपूर्वक पोलिसांना शासकीय काम करण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने आरेरावी करत धक्काबुक्की केली. तसेच धमक्या देत शिवीगाळ केल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेप्रकरणी नरसिंग गायकवाड यांनी दि. ४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२) तसेच संबंधित मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

0 Comments