बांध मोजणीदरम्यान गोंधळ; शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करत धमकी — तिघांवर गुन्हा-Crime News
धाराशिव, दि. २५ : कसबे तडवळे शिवारात सुरू असलेल्या शासकीय मोजणीच्या कामादरम्यान वाद निर्माण होऊन शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण, धमकी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास दत्तात्रय पवार, विमल विलास पवार व श्रीधर विलास पवार (रा. कसबे तडवळे, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी संभाजी जयराम तोगरे (वय ४१, रा. धामणगाव, ता. जळकोट, जि. लातूर) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता कसबे तडवळे शिवारातील गट क्रमांक ७६ व ७७ येथे बांधावर मोजणीचे शासकीय काम करत होते. त्यावेळी आरोपी घटनास्थळी आले आणि त्यांनी शिवीगाळ करत वाद घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या स्टाफला लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. याच दरम्यान आरोपींपैकी एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेमुळे सुरू असलेल्या शासकीय मोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी संभाजी तोगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २२६, २२१, ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments