सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या?; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल- लोहारा तालुक्यातील घटना; Lohara Live Breaking News-
धाराशिव : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुरूम पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या माहितीनुसार, मयत विद्या धोंडुशा सुलतानपुरे (रा. आष्टाकासार, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दि. १४ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी संगिता राजेंद्र सारणे (वय ३८, रा. दाळींब, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी दि. १५ जून २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी धोंडुशा नागनाथ सुलतानपुरे, चंद्रकला नागनाथ सुलतानपुरे व नागनाथ धोंडप्पा सुलतानपुरे (सर्व रा. आष्टाकासार, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी मयत विद्याला मेडिकलचे दुकान मोठे करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच विवाहात रितीरिवाजाप्रमाणे मानपान झाला नसल्याचे कारण देत तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून विद्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मुरूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108, 80, 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0 Comments