पंढरपुरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून; मृतदेह रेल्वे रुळावर, कापलेला पाय घराच्या दारात लटकावला-Pandharpur Murder Crime News
किरकोळ वादातून संतापजनक घटना; शहरात खळबळ, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर शहरातील अनिलनगर परिसरात एका 24 वर्षीय रिक्षाचालकाची किरकोळ वादातून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह रेल्वे रुळावर टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर मृताचा एक पाय कापून त्याच्या घराच्या दरवाजासमोर लटकावल्याने संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्या झालेल्या तरुणाचे नाव रोहित मधुकर कोरे (वय 24, रा. अनिलनगर, पंढरपूर) असे आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री घडली असून मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी रेल्वे पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्याचवेळी अनिलनगर भागात एका घराच्या दरवाजासमोर तोडलेल्या पायाचा काही भाग लटकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी दोन्ही घटनांची सांगड घातल्यानंतर दरवाजासमोर आढळलेला पाय आणि रेल्वे रुळावरील मृतदेह हा रोहित कोरे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
प्राथमिक तपासात रोहित कोरे याचा सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काही मित्रांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वादानंतर काही व्यक्ती त्याला घरातून सोबत घेऊन गेल्या होत्या. संबंधित व्यक्तींनी मद्यप्राशन केल्याचेही सांगितले जात आहे. घरातून निघताना रोहितने आपल्या आईकडे भांडण होण्याची शक्यता व्यक्त केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
दरम्यान, रोहित हा नेहमी रेल्वे रुळांच्या परिसरात जात नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे. मारेकऱ्यांनी दाखविलेल्या क्रूरतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
रोहितच्या आईने माध्यमांशी बोलताना, "माझ्या मुलाची निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी," अशी मागणी केली.
या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे करत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

0 Comments