चिवरी पाटी येथे गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक उघड; चार आरोपींवर गुन्हा दाखल-Naldurg Police Station Crime News
चार वाहनांतून जनावरांची कोंबून वाहतूक; चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याने पोलिसांची कारवाई
तुळजापूर / प्रतिनिधी :
नळदुर्ग पोलिसांनी गोवंशीय जनावरांची कथित बेकायदेशीर व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. १४ जून २०२६) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान तुळजापूर–नळदुर्ग मार्गावरील चिवरी पाटी येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव इंद्रजीत कांबळे (वय ३४, रा. भंडारी, जि. धाराशिव), विशाल विकास बनसोडे (वय ३५, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर), महादेव गोविंद धाकतोडे (वय ५०, रा. सारोळा, ता. तुळजापूर) आणि लखन हनुमंत मोटे (वय ३०, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) यांनी विविध मालवाहतूक वाहनांमधून गोवंशीय जनावरांची वाहतूक केली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी चार वाहनांमध्ये एकूण अनेक जर्सी गायी, खोंडे, कालवडी, रेडे व वगार अशी जनावरे आढळून आली. या जनावरांना वाहनांमध्ये कोंबून ठेवण्यात आले होते तसेच चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. प्राथमिक तपासात ही वाहतूक कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी वाहनांसह अंदाजे ६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ) व 9 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments