इटकळ: ४७५ महिला शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप; सामाजिक संस्थांचा स्तुत्य उपक्रम-Local News
-------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- नाम फाउंडेशन, पर्याय संस्था कळंब व पोर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था, अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने इटकळ परिसरातील विधवा, एकल व परित्यक्ता अशा ४७५ महिला शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० किलो सोयाबीन बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे खरीप हंगामासाठी महिलांना मोठा आधार मिळाला आहे.या कार्यक्रमाला अणदूरचे सरपंच मा. रामचंद्र दादा आलुरे, कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. हणमंत भिंगारदिवे, जि. प. सदस्य डॉ. जितेंद्र भय्या कानडे, उद्योजक धनराज मूळे, आप्पू दादा धमूरे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, कृषी सहायक सरडे सर, पर्याय संस्थेचे मार्गदर्शक अण्णा तोडकर तसेच अध्यक्षा शारदा शिंदे व सचिव बाबई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी महिला शेतकऱ्यांना बियाणे प्रक्रिया, बियाणे चाचणी, योग्य पेरणी पद्धत, संतुलित खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अधिक उत्पादनासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.सरपंच रामचंद्र दादा आलुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक संस्थांचे आभार मानले. “महिला शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण विकासाला गती देणारे आहेत,” असे त्यांनी नमूद केले.पर्याय संस्थेचे मार्गदर्शक अण्णा तोडकर यांनीही सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन गरजू महिलांना बळ देण्याची गरज व्यक्त केली. “महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास गावाचा सर्वांगीण विकास होईल,” असे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे लाभार्थी महिला शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

0 Comments