उमरगा-लोहारा मतदारसंघातील जनहिताच्या ११ प्रमुख प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवावा; ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे आमदार प्रवीण स्वामी यांना निवेदन-Umerga Live News Daily
उमरगा (प्रतिनिधी): येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमरगा-लोहारा मतदारसंघातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे चर्चा घडवून आणावी तसेच संबंधित मंत्री, विभागीय अधिकारी आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि सीमाभागातील उमरगा-लोहारा मतदारसंघ आजही अनेक मूलभूत सुविधांच्या प्रश्नांनी ग्रस्त असून नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनात प्रश्न, सूचना, चर्चांच्या माध्यमातून विषय मांडण्याची गरज असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
फाउंडेशनने प्राधान्याने मांडलेल्या मागण्यांमध्ये उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील दीड वर्षांहून अधिक काळापासून बंद असलेली शवविच्छेदनासाठी आवश्यक शीतगृह (फ्रीजर) सुविधा तात्काळ सुरू करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शीतगृह बंद असल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना अमानुष हाल सहन करावे लागत असून हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय उमरगा बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती देऊन काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांसाठी सर्व सोयींसह पर्यायी व्यवस्था उभारणे, ग्रामीण भागातील एस.टी. बससेवा वाढविणे, बंद फेऱ्या पूर्ववत सुरू करणे आणि ई-बस सेवांचा विस्तार करणे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामांचा आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करावीत तसेच दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी व दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष आर्थिक पॅकेज, बियाणे, खते, पीकविमा, चारा उपलब्धता आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांवरही भर देण्यात आला आहे.
निवेदनात ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण रस्ते प्रकल्प, पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व खड्डेमुक्ती मोहीम राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच अनेक गावांमध्ये लोंबकळणाऱ्या वीजतारा आणि धोकादायक वीजवाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने विशेष मोहीम राबवून सर्वेक्षण व दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उमरगा एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आकर्षित करण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवून स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती करावी, शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न सोडवावा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
शहरातील वाढता डुकरांचा उपद्रव, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या आणि अस्वच्छता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय कर्नाटक सीमेलगतच्या गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही फाउंडेशनने केली आहे.
हे प्रश्न केवळ प्रशासकीय स्वरूपाचे नसून थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याने त्यावर शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आमदार प्रवीण स्वामी यांनी पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न प्रभावीपणे मांडून संबंधित विभागांकडून ठोस कार्यवाही करून घ्यावी, अशी अपेक्षा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, उपाध्यक्ष व्यंकट उर्फ राजू भालेराव, सचिव किशोर औरादे यांच्यासह ॲड. ख्वाजा शेख, ऍड. अर्चना जाधव, धानय्या स्वामी, प्रदीप चौधरी, ज्योती माने, शबाना उडचणे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण, कविता साळी, करिम शेख, बबीता मदने आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले.

0 Comments