पंढरपुरात हृदयद्रावक दुर्घटना : पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू; विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा अंत-Pandharpur Two Farmers Accident News
सोलापुर , प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विजेचा तीव्र धक्का लागल्याने शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी घटना घडली आहे. पतीला विजेचा शॉक लागल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीचाही त्याच दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेमुळे आंबे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय ५५) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात शेती पंपासाठी पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा सुरू होतो. रविवारी रात्री उशिरापर्यंत परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे नदीकाठावरील शेती पंपाच्या मोटारीत काही तांत्रिक बिघाड झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे.
सोमवारी पहाटे वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर लक्ष्मण नागणे हे मोटार बंद करण्यासाठी गेले. मात्र, परिसरात पाणी साचलेले आणि ओलावा असल्याने मोटारजवळ वीज प्रवाह निर्माण झाला. मोटार हाताळत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला.
पती विव्हळत असल्याचे पाहून पत्नी अलका नागणे या त्यांना मदत करण्यासाठी तातडीने धावल्या. त्यांनी पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पावसामुळे परिसरात वीज प्रवाह पसरल्याने त्यांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. काही क्षणांतच दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी जमा झाले. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले असून नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी या दाम्पत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, पावसाळ्यात शेती पंप, उघड्या विद्युत वायर आणि ओल्या परिसरात विद्युत उपकरणे हाताळताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

0 Comments