फेसबुकवरील नोकरीची जाहिरात ठरली सापळा; थायलंडमध्ये तरुणाला डांबून ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतल्याचा धक्कादायक आरोप-Dharashiv Crime News Daily Update
धाराशिव, दि. ५ जुलै : फेसबुकवरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातीला भुलून थायलंडमध्ये गेलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणाला तेथे डांबून ठेवत त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक व एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर हरिश्चंद्र गरड (वय २५, रा. खेड, ता. जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ अनिकेत हरिश्चंद्र गरड (वय २२) याने फेसबुकवर प्रसिद्ध झालेली परदेशातील नोकरीची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर अज्ञात मोबाईल क्रमांकधारक व इतर अज्ञात एजंटांनी संगनमत करून अनिकेतला थायलंडमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादीनुसार, आरोपींनी अनिकेतची फसवणूक करून त्याला थायलंडमध्ये नेले. तेथे त्याला इच्छेविरुद्ध डांबून ठेवण्यात आले असून त्याच्याकडून ऑनलाइन फसवणुकीचे (सायबर फ्रॉड) काम करून घेत असल्याचा तसेच त्याचा मानसिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ज्ञानेश्वर गरड यांनी ३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२७(२), १२७(४), १४३, ३१८(४), ६१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करीत असून संबंधित तरुणाची सुरक्षित सुटका करण्यासाठी आणि या आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटचा माग काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सोशल मीडियावरील परदेशातील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनी, एजन्सी व भरती प्रक्रियेची खातरजमा करण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

0 Comments