मौजे काटगाव तलावावरील शेतकऱ्यांच्या केबल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; अट्टल चोरट्यांची टोळी अखेर जेरबंद-Breaking News Live
-------------------------------------------
पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश.
-----------------------------------------
पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज कारवाई; हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी यांची महत्त्वपूर्ण भूमिका
----------------------------------------
तामलवाडी, अक्कलकोट, नळदुर्गसह अनेक चोरीच्या गुन्ह्यांची आरोपींकडून कबुली; ३५ किलो तांब्याची तार व मोटारसायकल जप्त.
------------------------------------------
इटकळ ( दिनेश सलगरे):- गेल्या अनेक महिन्यांपासून तुळजापुर तालुक्यातील मौजे काटगाव तलाव परिसरासह काळेगाव, येवती, इटकळ, उमरगा (चि.), केरूर, धनगरवाडी आणि बाभळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व त्यांना जोडलेल्या केबल वायर चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले होते. अखेर या चोरीमागील अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि.२६ व २७ जूनच्या मध्यरात्री काटगाव येथील साठवण तलावावरील सुमारे ३५ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींना जोडलेल्या अंदाजे ३,६०० फूट लांबीच्या ४ एम.एम. तांब्याच्या केबल वायर चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या प्रकरणी शेतकरी तुकाराम केशव माळी यांनी इटकळ आऊटपोस्ट येथे तक्रार दाखल करून काही संशयितांची नावेही पोलिसांना दिली.या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आरोपी मारुती उर्फ बाबा महादेव वाघमारे, लक्ष्मण हनुमंत माळी, मारुती साधू वाघमारे आणि कैमुद्दिन अहमद रंगारी (सर्व रा. काटगाव, ता. तुळजापूर) यांना अटक केली.कसून चौकशीदरम्यान आरोपींनी काटगाव केबल चोरीसह तामलवाडी, अक्कलकोट आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून ३५ किलो तांब्याची तार तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.चौकशीत आरोपींनी यापूर्वी एक बुलेट, तीन हिरो स्प्लेंडर, एक एच.एफ. डिलक्स मोटारसायकल आणि एक पाणबुडी मोटार चोरी केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या अट्टल चोरट्यांच्या टोळीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी , पो.हे.कॉ.चाबुकस्वार, पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन घुले आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

0 Comments