तुळजापुर: जळकोट येथील भांड्याच्या दुकानातील चोरीचा उलगडा; लातूर जिल्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद, १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त-Naldurg Police Station Crime News
धाराशिव, दि. ५ जुलै : धाराशिव जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई सुरू ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एका घरफोडीचा यशस्वी उलगडा केला आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जळकोट येथील भांड्याच्या दुकानातील चोरीप्रकरणी लातूर जिल्ह्यातील सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला तब्बल १ लाख ७० हजार ५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ४ जून २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक २७६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अचूक सापळा रचत आरोपीपर्यंत मजल मारली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने नरसिंग दत्तू माने (वय ३५, रा. तगरखेड, ता. निलंगा, जि. लातूर) या सराईत गुन्हेगारावर पाळत ठेवून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत आपल्या अन्य साथीदारांचीही नावे पोलिसांना सांगितली. या गुन्ह्यातील सर्व आरोपी लातूर जिल्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली पितळी व तांब्याची भांडी तसेच दोन एलईडी टीव्ही असा एकूण रु. १,७०,०५५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल शुभम बिराजदार (टीएडब्ल्यू) तसेच चालक पोलीस हवालदार नागनाथ गुरव यांच्या पथकाने पार पाडली.
धाराशिव जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रभावी कारवाया सुरू असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

0 Comments