चिवरी येथे पाणी भरण्यावरून वाद; महिलेस स्टीलच्या बादलीने मारहाण, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल -Chivari Breaking News- Update
तुळजापूर, दि. १० जुलै : तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावात सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व स्टीलच्या बादलीने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवानंद राम दुगनुरे व लक्ष्मी शिवानंद दुगनुरे (दोघे रा. चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास चिवरी येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ फिर्यादी मनिषा सतीश धप्पाधुळे (वय ३५, रा. चिवरी) यांच्याशी पाणी भरण्याच्या कारणावरून वाद घातला.
फिर्यादीनुसार, वाद वाढल्यानंतर आरोपींनी मनिषा धप्पाधुळे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच स्टीलच्या बादलीने त्यांच्या अंगावर वार करून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर मनिषा धप्पाधुळे यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी शिवानंद राम दुगनुरे व लक्ष्मी शिवानंद दुगनुरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलिस करत असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

0 Comments