उपोषणाचा अर्ज दिल्याच्या रागातून लोणी येथे घरावर सशस्त्र हल्ला; मोटारसायकल व स्टीलची टाकी फोडली, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल -Dharashiv Crime News Update
परंडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोणी येथे उपोषणाचा अर्ज दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीच्या घरावर सशस्त्र हल्ला करून मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल विठ्ठल शिंदे (वय 34, रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 10 जुलै 2026 रोजी पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिन नवनाथ इतापे (रा. लोणी, ता. परंडा), वैभव गोरख कोडलिंगे (रा. शेंदरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) तसेच इतर दोन जण त्यांच्या घरासमोर आले.
यावेळी आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, दगड आणि विटांचा वापर करून घराच्या दरवाज्यावर व पत्र्यावर हल्ला केला. तसेच घरासमोर उभी असलेली मोटारसायकल आणि स्टीलची पाण्याची टाकी लोखंडी रॉडने फोडून त्यांचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी "तू उपोषणाचा अर्ज का दिलास?" असा जाब विचारत फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी राहुल शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125, 329(3), 352, 351(2)(3), 324(4), 3(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

0 Comments