Umerga-अल्पवयीन मुलीचा बालविवाह; उमरग्यात पतीसह आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल-मुलीने बालिकेला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघड -POCSO Act
धाराशिव (प्रतिनिधी) :
उमरगा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी पतीसह मुलीचे आई-वडील यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा उमरगा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता, बालविवाह प्रतिबंध अधिनियम आणि बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील 18 वर्षे 5 महिने वयाच्या पीडितेचा (नाव व गाव गोपनीय) अल्पवयीन असतानाच तिच्या आई-वडिलांनी एका तरुणाशी विवाह लावून दिला. विवाहानंतर संबंधित तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडितेला एका मुलीचा जन्म झाला. त्यानंतर पीडितेने 24 जुलै 2026 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित तरुण तसेच बालविवाहास कारणीभूत ठरलेल्या आई-वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2), 64(2)(M), 3(5), बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 मधील कलम 9, 10 व 11 तसेच बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 मधील कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

0 Comments