राजमाता जिजाऊंचे वंशज राजे अमरसिंह जाधवराव सपरिवार तुळजाभवानीच्या चरणी; मातेचे दर्शन घेत भरली साडी-चोळीची ओटी
“इतिहास आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आपले आद्य कर्तव्य” — राजे अमरसिंह जाधवराव
तुळजापूर : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे वडील शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांच्या वंशपरंपरेतील राजे अमरसिंह जाधवराव यांनी सपरिवार तुळजापूर येथे येऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी व आपल्या कुलदेवी श्री तुळजाभवानी मातेचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून मातेच्या चरणी साडी-चोळीची ओटी भरत आशीर्वाद घेतला.
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात राजे अमरसिंह जाधवराव आपल्या कुटुंबीयांसह दाखल झाले. यावेळी मंदिर परिसरात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबासह मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी देवीच्या चरणी समाजातील सलोखा, शांतता आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले तसेच स्थानिक नगरसेवक व जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर भैय्या शेळके यांच्या वतीने राजे अमरसिंह जाधवराव व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे धार्मिक विधी व पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले.
तुळजाभवानी मातेने दिली स्वराज्य स्थापनेची प्रेरणा
दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजे अमरसिंह जाधवराव यांनी तुळजाभवानी मातेप्रती असलेली श्रद्धा व्यक्त केली. ते म्हणाले, “तुळजाभवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आमची कुलदेवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना याच देवीने स्वराज्य स्थापनेची प्रेरणा व शक्ती दिली. आज या पवित्र क्षेत्री सपरिवार येऊन मातेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, याचा मनस्वी आनंद आहे.”
पुढे बोलताना त्यांनी इतिहास आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. “आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजामध्ये सलोखा, शांतता आणि समृद्धी नांदावी, यासाठी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी जाधवराव परिवारातील सदस्य, स्थानिक नागरिक तसेच तुळजाभवानी मंदिरातील भोपे पुजारी उपस्थित होते. यावेळी जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मधुकर भैय्या शेळके, जिजामाता तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष सुजय शेळके, नाना कदम, स्वराज कदम, महेश शिंदे, राहुल जाधव, बालाजी तट, दशरथ तट आदी उपस्थित होते.
राजे अमरसिंह जाधवराव यांच्या सपरिवार तुळजाभवानी दर्शनामुळे ऐतिहासिक जाधवराव घराण्याची तुळजाभवानी मातेवरील श्रद्धा आणि तुळजापूरच्या धार्मिक व ऐतिहासिक परंपरेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

0 Comments