गंधोरा शिवारातून तीन म्हशींची चोरी; शेतकऱ्याचे १ लाख ६० हजारांचे नुकसान
पत्र्याच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी म्हशी लंपास; नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तुळजापूर : गंधोरा (ता. तुळजापूर) शिवारातील शेतात बांधून ठेवलेल्या तीन म्हशी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत शेतकऱ्याचे तब्बल १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरु निलाप्पा सोनटक्के (वय ५७, रा. गंधोरा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे गंधोरा शिवारात गट नं. २८६ मध्ये शेत आहे. या शेतातील पत्र्याच्या गोठ्यात त्यांनी आपल्या म्हशी बांधून ठेवल्या होत्या.
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोठ्यातून एकूण तीन म्हशी चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या म्हशींची एकूण किंमत १ लाख ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटना लक्षात आल्यानंतर शेतकरी बिरु सोनटक्के यांनी याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
म्हशींचा शोध घेण्यासह अज्ञात चोरट्याचा तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

0 Comments