Hot Posts

6/recent/ticker-posts

जळकोट येथे मराठा समाजाच्या वतीने पोलिसी लाठीमाराचा निषेध : जळकोट बंद

जळकोट येथे मराठा समाजाच्या वतीने पोलिसी लाठीमाराचा निषेध : जळकोट बंद       


         
तुळजापुर :-- अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांचा व राज्य सरकारचा तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील मराठा समाजासह सर्व जाती धर्म समावेशक नागरिकांनी तीव्र निषेध केला. 

येथील मराठा समाज बांधवांनी हातात निषेधाचे फलक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर ( क्रमांक 65 ) निषेधाच्या घोषणा देत फेरी काढून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक न रोखता 15 ते 20 मिनिटे सेवा मार्गावर ठिय्या देऊन सरकार विरोधात आपला रोष व्यक्त करून सदर मार्ग मोकळा केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश कदम, काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, संजय मोरे, ब्रह्मानंद कदम आदींची निषेधपर भाषणे झाली. तत्पुर्वी संपूर्ण गावातील व्यवहार पूर्णपणे बंद होते. सदर निषेध सभेत व्यापाऱ्यांनी आज दिवसभर दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले. सदर मोर्चामध्ये सरपंच अशोकराव पुंडलिकराव पाटील, राष्ट्रवादीचे महेश कदम, श्रीनिवास पाटील, अॅड सचिन कदम, ब्रह्मानंद कदम, गणेश कदम, नागनाथ कदम, शिवानंद गंगणे, सचिन गंगणे, विश्वास भोगे, मनोज लष्करे, गुणवंत पाटील, रवीकुमार पाटील, प्रवीण पाटील आदी मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे हवालदार भरत पाठक, पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्नील गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दांडेकर यांनी चोख बंदोबस्त हाताळला. जळकोट मधील व्यवहार संपूर्ण दिवसभर बंद असल्याने फळविक्रेते, टमटम चालक, वडापाव विक्रेते, नाष्टा सेंटर आदींसह आणि व्यावसायिक आस्थापने बंद असल्याने नागरिकांचे हाल तर झालेच त्याचबरोबर छोट्या व्यवसायिकांचे आर्थिक नुकसानही झाले. त्यातच बाहेर गावाहून आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांना हॉटेल व्यवसाय बंद असल्याने जेवण, नाष्टा तर मिळाला नाहीच शिवाय पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. खेड्यापाड्यांना जाणारे टमटम ही बंद असल्याने आडमार्गाला जाणारे प्रवाशी अडकून पडले. दिवसभर व्यवसाय बंद राहिल्याने तब्बल वीस ते पंचवीस लाखांची उलाढाल झाली नसल्याने आर्थिक नुकसान झाले.

Post a Comment

0 Comments