गोकुळाष्टमीनिमित्त कारागृहातील कैद्यांचे प्रबोधन
जिल्हा कारागृह अधीक्षक, कर्मचार्यांचा पुढाकार
धाराशिव, दि ८: विविध गुन्ह्यातील कैदींचे प्रबोधन करून त्यांना गुन्हेगारीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा कारागृह प्रशासनाच्यावतीने गोकुळाष्टमीचे औचित्य साधून किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी गोकुळाष्टमीनिमित्त हभप. निलेश महाराज झरेगावकर यांच्या प्रबोधनात्मक किर्तनातून कैद्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
धाराशिव येथील जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरूंग अधिकारी दिगंबर इगवे यांच्या पुढाकारातून कारागृहात विविध गुन्ह्यांत कैद असलेल्या कैदींसाठी गुरूवारी गोकुळाष्टमीनिमित्त हभप. निलेश महाराज झरेगावकर यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. या किर्तनातून झरेगावकर महाराजांनी, माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो. परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते. तसेच काही व्यक्ती ठरवून गुन्हेगारीकडे वळतात आणि आपली दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते क्षणीक सुख आहे. एक ना एक दिवस त्याला तुरूंगवास होतोच. त्यामुळे माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे योग्य ठरते. देव आणि अल्लाह दोघेही गुन्हेगारीऐवजी मानवता शिकवतात. त्यामुळे आपल्या डोक्यातील गुन्हेगारी काढून टाकावी आणि परमेश्वराचे नामस्मरण करावे, असे आवाहन केले.
यावेळी गोकुळाष्टमीनिमित्त उपस्थित कारागृह कर्मचारी व कैदींना काल्याचा प्रसाद देण्यात आला. दरम्यान खामसवाडी येथील भजनी मंडळातील पोपटराव भोसले, रामहरी मुळे, आण्णासाहेब दुधभाते, भारत भोसले, राजाभाऊ भोसले, काकासाहेब दुधभाते, राम गुंडगिरे, बाबुराव पुजारी, औदुंबर खलाटे, त्रिंबक आबा कुटे, दिपक लोंढे, पवन पाटील यांनी वेगवेगळी भजने गावून बंदीवानांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सामाजिकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरूंग अधिकारी दिगंबर इगवे, सुभेदार गोसावी, जाधव तसेच कर्मचारी शिरसाठ, भास्कर फरताडे, वालचंद केंद्रे, गणेश वाणेकर, राम देवकर, विजय हजारे आदी उपस्थित होते.
0 Comments