औसा–तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कारची ट्रक व कंटेनरला धडक, चौघांचा जागीच मृत्यू-Latur-Ausa Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

औसा–तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कारची ट्रक व कंटेनरला धडक, चौघांचा जागीच मृत्यू-Latur-Ausa Accident News

औसा–तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कारची ट्रक व कंटेनरला धडक, चौघांचा जागीच मृत्यू-Latur-Ausa Accident News 

 लातूर : औसा–तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी दि,६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता तीन वाहनांचा भीषण आणि विचित्र अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रक आणि कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयानक होता की महामार्गावर रक्ताचा सडा पडला असून मानवी अवयवांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथील बीएमडब्ल्यू कार (एमएच ०४ ईजी ७५००) काही कामानिमित्त लातूर येथे आली होती. काम आटोपल्यानंतर संबंधितांनी शिवली येथे जेवण केले. त्यानंतर सहकाऱ्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत होती. दरम्यान, औसा शहराजवळील एका हॉटेलसमोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच २५ यू ०५२२) आणि त्याच्यापुढे असलेल्या कंटेनरला (एमएच १२ एफसी ७६४२) कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, लाकडाने भरलेला ट्रक जवळपास शंभर फूट पुढे जाऊन उलटला. तर बीएमडब्ल्यू कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

या अपघातात चालक धनराज काशिनाथ जाधव (वय ४९, रा. सांगली), आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (वय ३६), शुभम शेषेराव पाटील (वय २६) आणि किसन रामलिंग साळुंके (वय ४९, तिघेही रा. बोरगाव, ता. औसा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयहिंद विश्वास जाधव (वय ३०, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (वय २८, रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक रेवण डमाले, फौजदार भाऊसाहेब माळवदकर यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

बोरगाववर शोककळा

या भीषण अपघातात औसा तालुक्यातील बोरगाव येथील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्यावसायिक कामानिमित्त प्रवास

मृत धनराज जाधव हे सांगली येथील व्यापारी होते. बोरगाव येथील काही युवकांच्या मदतीने ते औसा तालुका आणि परिसरात व्यवसायाचे जाळे उभारण्याचा प्रयत्न करीत होते. लातूर येथे कार खरेदी केल्यानंतर सर्वजण जेवणासाठी शिवली येथे गेले होते. तेथून औसाकडे परतताना हा दुर्दैवी अपघात झाला.औसा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


Post a Comment

0 Comments