भूकंपाचा धक्का अजूनही मनाला हादरा देतोयच..... दयानंद काळुंके, अणदुर ता. तुळजापुर
-------------------------------------------------------
30 सप्टेंबर 1993 चा तो प्रलयंकारी सास्तुर,किल्लारीचा(killari) भूकंप, त्याचा आज ३० वा स्मृतिदिन, त्या घटनेची क्षणांची आठवण आली की अंगावर आजही काटे उभे राहतात, त्या भूकंपाचे असाहाय्यक चटके मी सहन केलेले आहेत ,30 सप्टेंबरची ती काळी रात्र अनेक चिमूरड्यांचा, माया बहिणींचा बंधुचा,मुक्या जनावरांचा जीव घेणारी ठरली, अनेकांच्या तोंडात माती घातली, अनेक खेडी भुईसपाट झाली, माझं जुनं गाव(old villege) त्या गावाची वेस त्या गावाची संस्कृती, त्या गावातील नातेसंबंध त्या गावातील आदर्श आठवणी भुईसपाट झाल्या !
जात्यावर ओव्या गाणाऱ्या माझ्या आजीचा व शेतात पाटावर पाणी देणाऱ्या माझ्या आज्याचा अंत याच भूकंपात झाला, टोलेजंग वाडे,खणाच्या इमारती बेचिराक झाल्या, केविलवाल्या स्वरात अनेक जण ओरडू लागली होती,आई बाळासाठी टाहो फोडत होती तर बाळ आईसाठी किंकाळ्या मारत होते, दावणीची जनावरे हंबरडा फोडत होती, वाचवा वाचवा अशा किंकाळ्या ऐकू येत होत्या
गणपती विसर्जनाच्या मिरवणुका संपवून धरणीला पोरांनी पाट लावली होती,पावसाची मारझोड सुद्धा तशी सुरू होती, तळहाताच्या खोडाप्रमाणे सांभाळलेली लहान लहान पोरं मातीच्या देणाऱ्याखाली गुदमरून शेवटचा श्वास सोडत होती, सगळीकडे आहाहाकार माजला होता, मरणाऱ्यांची संख्या जास्त होती त्यामुळे वाचवायला जाणारे कमी होते
ही बातमी जगभर (news world) पसरली जगभरातून अनेक लोक धावून आले, शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र शासन महाराष्ट्र शासनाच्या अनेक तुकड्या घटनास्थळी त्वरित दाखल झाल्या, प्रेताचे ढिगारे हलवण्याचे काम चालू होते मिळेल त्या जागेवर प्रेताचे ढिगारे जमू लागले होते,जमा केलेल्या प्रेतात सर्वच जाती-धर्माचे प्रेत होते ,माणसं आणि जनावरं हजारोच्या संख्येने एकाच ठिकाणी गाढली,जाळली गेली! लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनेक कुमारीकाना लग्नाअगोदरच काळाच्या पडद्याआड जावं लागलं, अनेक चिमूरड्यांना आपल्या चुंचीत चारा भरवणाऱ्या मातापित्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली, आईच्या कुशीत विसावा घेणाऱ्या पाच दिवसाच्या बाळालाही या भुकंपाने सोडलं नाही, हजारो माणसे गावातून निघून गेली, गावे ओस पडली, जिथे जागा मिळेल तिथे जिवंत माणसे राहू लागली, माणसा माणसांमध्ये माणुसकीचा जिवंत प्रेमाचा झरा खळखळत होता, महाराष्ट्रासह जगातून अनेक सहानुभूतीचे हात आणि लाट समोर येत होती, अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत होता, अनेक सेवाभावी संस्था धावून आल्या मानसिक आधार देऊन भूकंपग्रस्तांच्या मनाचे पुनर्वसन प्रत्येकजण करीत होते ,अनेक बेवारसांना मायेचा, ममतेचा ओलावा दिला, आरोग्यावर काम करणारी मंडळी प्रामाणिक काम करून त्यांना सेवा पुरवीत होती.
या असाहाय्य दुःखामध्ये सर्वच सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा जगासमोर घडून आणलं ,गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अनेक पुढारी गर्दी करू लागले होते,जागतिक बँकेच्या मदतीने घराच्या पुनर्वसनाचे काम जोरात सुरू झाले, आर्थिक ,मानसिक साह्याने कामाला वेग आला, पण तीच भूकंपग्रस्त माणसं अपंग व अधू झाली, सगळं मिळू लागलं, पैसा, अन्नधान्य, कपडालत्ता म्हणून तीच माणसं आळशी बनत गेली, कष्ट करण्याची प्रवृत्ती नाहीशी होत गेली, व्यसनं वाढली, पुनर्विवाह होऊ लागली, प्रत्येकाला घर मिळालं घरासमोर झाडे झुडप लावली, घरात भूकंपात गेलेल्या माणसाच्या प्रतिमा लावल्या, धरणी कोपली,त्याच धरतीवर माळरानाचे नंदनवन झाले पण त्या जुन्या आठवणी, जुन्या संस्कृती ,जुनी नातेसंबंध, गावातील पार ,त्या पारावरील गप्पा ,गाव राखणारा पहारेकरी, गावात दिसणारे असंख्य कंदील त्यांच्या प्रकाशावर जीवन जगणारा उपेक्षित समाज ,जात्यावर ओव्या गाणाऱ्या माय माऊली ,घरात काय नसेल तर उसणं मागवून संसार चालवणारी मानसिकता, गाव विकासाच्या या संपूर्ण जुन्या रूढी ,परंपरा आज केवळ भूकंपामुळेच लोप पावल्या आहेत, भूकंपाच्या या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त भूकंपातील आठवणींना मी उजाळा दिला आहे, त्यावेळेस जे जे कोणी सर्वस्व हरवून निराश जीवन जगत आहेत अशा सर्व भूकंपग्रस्त बंधू-भगिनींनी आपले मागील सर्व दुःख विसरून त्यांच्या स्मृतीच्या ताकदीवर आपले पुढील यशस्वी जीवन फुलवावे, या प्रलयंकारी भूकंपात नाहक बळी गेलेल्या माता-पिता पुत्राना, बंधू भगिनींना,चिमुरड्यांना, अबाल वृद्धांना या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली !
शब्द संकलन-- दयानंद काळुंके, अणदूर ता तुळजापूर
0 Comments