Hot Posts

6/recent/ticker-posts

आंबेडकरी चळवळीतील धर्मा लिंबुडकर अर्थात देठे मामा देवापूरकर

आंबेडकरी चळवळीतील धर्मा लिंबुडकर अर्थात देठे मामा देवापूरकर 


 नातेपुते : अंगात तीन गुंड्यांचा गुडघ्यापर्यंत पंखा येणारा सदरा,धोतर, रंग सावळा,उंचीने बुटके (५फूट २इंच),शरीराने काटक,चपळ, नाक सरळ, चेहरा उभट ,डोळे दयाळू, कानाच्या पाळ्या लोंबत्या आणि कानात व कानावरही भाग्यवान माणसा प्रमाणे केस.पण वाट्याला मात्र दारिद्र्य.

बोलताना डोक्याला हात लावणार,कधीतरी मिस्किल हसणार.उर्मटपणा. कधीच नाही,कधी कोणाशी भांडण तंटा नाही,सर्वांशी प्रेमाने बोलणे,गोडी गुलाबी ने राहणे ही त्यांच्या स्वभाव धर्माची वैशिष्ट्य होती.

यात्रा जत्रा यांची आवड त्यावेळी फेटा बांधून मिरवत. पानांची चंची सोबत, गवंडी काम व घडय जुडय करणारा कुशल कारागीर,अत्यंत प्रामाणिक व नेहमी खरेपणाने वागणारा "धर्मराज शिकारीचा भारी छंद त्यामुळे शिकारीत तरबेज असणारी देवापूरातील रामोशी वाड्यातील तगडी पोरं त्यांचे दोस्त.काम नसेल त्या दिवशी कुत्री घेऊन बाभळवाडा ,इनाम या जंगली परिसरात भटकंती ठरलेली.

मूळगाव निंबावडे ता. आटपाडी हा भाग त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील केंद्र.स्वच्छ रहा,घाणेरडी कामे सोडा, पड खाऊ नका, काबाडकष्ट करुन जगा, स्वाभिमान जपा तरच लोक तुम्हाला माणसात घेतील असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सभेत बोलताना दिलेला, हा आदेश मानून अनेकांनी गावकिची कामे सोडली.त्यामुळे गावकय्रांनी गावबंदी केली,कांहीं ठिकाणीं मारा माय्रा झाल्या अन्याय वाढला,पण महार लोक नमले नाहीत .पोटाला अन्न मिळेना,खायचे काय? जगायचे कसे?लेकरा बाळांना सांभाळायचे कसे?म्हणून महार लोक शहराकडे स्थलांतर करु लागले.कांही नातेवाइकांच्या आश्रयाला गेले .

धर्मा ही सभेला गेलेले त्यानिही  गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सासरवाडी पुळकोटी वरुन निरोप आलेला,पण पाहुण्यांकडे किती दिवस राहणार? ते कांहीं मनाला पटेना .देवापूरहून मावशी  मायबया सरतापे हिने सांगावा धाडला ,हे गाव देवासारखे आहे,माणसं सज्जन आहेत ,गावकिची कामे नाहीत.

तू देवापूरला ये म्हणून धर्मा ने मावशीकडे कांहीं काळ राहण्याचा निर्णय घेतला.आणि पत्नी तानुबाई सह देवापूरला आले.अल्पावधीतच धर्माने गावकय्रांनी मने जिंकली.मिरवणुका, जयंत्या ,लग्नाच्या वराती मध्ये दांडपट्टा, लाठी काठी, लेझीम खेळून लोकांना थक्क केले. 

भेंड्यांच्या भिंती,त्यावर लिंबाचे वासे ,काडाने शाकारुंन कोपाट तयार केले. महारवाड्यातील एकमेव  घर .इथं प्रत्येकाचे घर माळवादी,दारात बैलगाडी, गाई म्हशी,,शेळ्या मेंढ्या त्यामुळे महार समाज सधन होता.

कांहीं वर्षात धर्मा आणि तानुबाई यांना तीन अपत्य झाली,सावित्रा,माणिक,पोपट.आता कुटुंबातील खाणारी तोंडें वाढली. तानुबाई  मजुरी करु लागली.

दारु आणि महार समाज यांच जन्मोजन्मीच नातं असावं असं वाटतं.दारुची चटक वारसाहक्काने च आली असेल? पण देवापूरातील महार समाज यास अपवाद होता,

एखादा दुसरा असतोच पिताडा.कधीतरी जत्राखेत्रा असल्यावर पिणारा. धर्मा मात्र कामावरुन येतानाच टाकून यायचे,पण दारुपिऊन धिंगाणा भांडण केलेले पाहिलेले नाही .कधी बायकोला सुध्दा शिवीगाळ केली नाही.कदाचित आपण लोकाच्या गावात राहतोय म्हंटल्यावर गुणाने राहावे असा निश्चय त्यांनी केला असावा कारण दारुची नशा सुध्दा नमायची.

धर्माला शिकण्याची खुप ईच्छा होती पण त्यांना शिकता आले नाही म्हणून मुलांना शिक्षण देण्याच त्यांनी ठाम ठरविलं होतं.ते पोरांना सांगत,आर शिकलात तरी सावलीत बसून खाल न्हाय तर आमच्या सारख दिवसभर उन्हात मरावं लागेल.बाबासाहेब सांगायचे शिका.त्याचा सबूद आपण पाळला पाहिजे,ते शाळेत बाहेर बसून शिकले आता त्यांच्या मुळ तुम्हाला शाळेत बसायला मिळतंय याचा फायदा करुन घ्या 

थोरला सातवी पास झाल्यावर पुळकोटी चे मामा यशवंत बनसोडे गुरुजी म्हणाले पावणे आता माणिकला मास्तर करु या तुमच्या प्रपंच्याला हातभार लागल.

तेंव्हा धर्मा म्हणाले होते मास्तर आमच्या पोटासाठी त्याला न्हाय शाळेत घातलं !"मी जित्ता हाय तवर त्याला शिकवीन,मामा काय बोलणार पण गरीब बापाची जिद्द पाहून मनोमन त्यांना वंदन केले असावे.

इयत्ता आठवीला माणिकला बोर्डिंगला पाठवताना आई रडू लागली तेंव्हा आण्णा म्हणाले अग पिलांना पंख आली की चिमण्या सुध्दा टोच्या मारुन त्यांना घरट्या बाहेर हाकलतात तवाच ती आभाळात ऊंच भरारी घ्यायला शिकतात ,पहिलं डोळे पूस आन काळजावर दगड ठेवून पोराला शिकायला जाताना हारल्यागत पाठव.आण्णा फक्त दुसरी शिकलेले तसे आडाणीच पण शिक्षण नसल्याने काय हाल होतात याचा प्रत्यक्ष अनुभव भोगलेले .आणि अनुभवातून जे शहाणपण मिळते त्याला व्यावहारिक तत्वज्ञान म्हणतात.त्याचे ज्ञान भांडार त्यांच्याकडे होते,ते त्यांनी कृतीतून सिध्द केले.

 एक आण्णा जन्मा घालून पालनपोषण करणारा तर दुसरे आण्णा शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून मोफत शिक्षण देऊन जीवन घडविणारा!

आण्णा होते म्हणून आम्ही आहोत

 त्यास्तव जन्मदात्याला आणि भविष्य घडविणाय्रा आण्णांना त्रिवार वंदन !

आज देठे अण्णांची सतरावी पुण्यतिथी ते एक सर्वसामान्य व्यक्तीमत्व पण अंगी असामान्यत्व.

त्यांनी जगलेल्या कांहीं वैशिष्ट्य पुर्ण गुणांची ओळख व्हावी या हेतुने  धर्मा लिंबुडकर अर्थात देवापूर करांचे देठे मामा यांचा अल्पसा परिचय श्रद्धांजली निमित्ताने त्यांच्या चरणी अर्पण!

     समस्त देठे परिवार

शब्द संकलन : माणिक देठे सर

Post a Comment

0 Comments