धाराशिव : श्रीपतराव भोसले जुनियर कॉलेजमध्ये विधी साक्षरता शिबिर संपन्न
धाराशिव : येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 'विधी साक्षरता शिबिर' आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. वसंत श्री. यादव, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांची उपस्थिती लाभली. तसेच श्रीमती बी. एम. कोठावळे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, उस्मानाबाद व श्री. संतोष घार्गे सर, उपप्राचार्य; श्रीपतराव भोसले जुनियर कॉलेज, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमांमध्ये ॲड. अभय पाथरूडकर, उपमुख्य लोक अभिरक्षक उस्मानाबाद; ॲड. मोहिनी शिरुरे, सहाय्यक लोक अध्यक्ष उस्मानाबाद; ॲड. विशाखा बंग, सहाय्यक लोक अभिरक्षक उस्मानाबाद; पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव, सायबर पोलीस धाराशिव; खांडेकर मॅडम इत्यादींनी मार्गदर्शनपर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. अभय पाथरूडकर यांनी चाइल्ड ट्राफिकिंग, बालमजुरी, बालकांचे होणारे शोषण, कायदे याविषयी माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव यांनी सायबर गुन्हे, सोशल मीडियाच्या मार्फत होणारी फसवणूक, सेक्सटोर्शन सारख्या गंभीर गुन्ह्याला लोक कसे बळी पडतात याविषयी मार्गदर्शन केले. ॲड. मोहिनी शिरुरे यांनी बालविवाह व त्यासाठी वेळोवेळी झालेले कायदे, बालविवाह घडवून आणणाऱ्यास शिक्षेची तरतूद, बालविवाहाची कारणे याची माहिती दिली. ॲड. विशाखा बंग यांनी २०१२ मध्ये अल्पवयीन मुलांसाठी करण्यात आलेल्या 'पोक्सो' या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी या कायद्याअंतर्गत मुलांना लैंगिक शोषणाविरुद्ध कोणते अधिकार मिळतात, कोणत्या कृती लैंगिक शोषणामध्ये मोडतात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुलांनी द्विअर्थी बोलणे, वाईट स्पर्श, सुरक्षित व असुरक्षित जागा ओळखाव्यात असा सल्ला त्यांनी दिला. तसेच खांडेकर मॅडम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक याविषयी जागरूक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वसंत श्री. यादव यांनी विधी साक्षरता विषयी मुलांना मार्गदर्शन करत अध्यक्षीय समारोप केला.
यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला व वाणिज्य विभाग प्रमुख, प्रा. श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी केले तर आभार प्रा. मोहिते के. बी. सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. देशमुख सर, प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्यभैया पाटील सर, संस्था अध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments