पशुधनाच्या लाळ खुरकत रोगासाठी
4 लाख 68 हजार 200 लसमात्रा प्राप्त
लसीकरणापासून पशुधन वंचित ठेवू नका
पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
धाराशिव,दि.२ : जिल्ह्यात 1 जानेवारीपासून पशुधनातील लाळ खुरकत रोगावरील लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. 45 दिवस ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात यासाठी 4 लाख 68 हजार 200 लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत.
पशुधनातील लाळ खुरकत हा रोग विषाणूजन्य आहे.या आजारात पशुधनास 105 ते 106 डिग्रीपर्यंत ताप असतो.या आजाराने दुधाळ जनावराच्या दुध उत्पादनात घट होते. पशुधनाच्या खुरामध्ये व तोंडामध्ये जखमा होतात व त्यांचे खाणे-पिणे बंद होऊन रोग प्रतिकार शक्ती कमी होते.तसेच गाभण गाय,म्हैस व शेळीचा गर्भपात होऊ शकतो.या रोगाचा प्रसार हवेतून एका बाधीत पशुधनापासून दुसऱ्या निरोगी जनावरांपर्यंत पोहचू शकतो.त्यामुळे लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.
लाळ खुरकत रोगावरील लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. 1 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लाळ खुरकत या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे.असे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकही पशुधन ही लस घेण्यापासून वंचित राहू नये,अशा सुचना जिल्ह्यातील पशुसंवर्धन पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक यांना जि.प.चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिल्या आहेत.
0 Comments