उमरग्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Adv. शीतल चव्हाण फाउंडेशची पोलीस प्रशासनाला कठोर उपाययोजनांची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी): उमरगा शहर व परिसरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 24 (मंगळवार) रोजी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने पोलीस स्टेशन उमरगा येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शहर व तालुक्यात वाढत चाललेल्या छेडछाड, पाठलाग, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेणे अशा प्रकारांविरोधात तातडीने कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्या प्रतिनिधींसह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून उमरगा शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या परिसरात टपोरी मुलांचे घोळके वाढले असून, मुलींची छेडछाड, टिंगल-टवाळी, घुरून पाहणे व पाठलाग करणे या प्रकारांत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक स्वास्थ्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे त्रिकोळी येथील एका अल्पवयीन मुलगी गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असल्याची गंभीर बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना निर्माण झाली असून, या प्रकरणाचा जलद व सखोल तपास करून संबंधित मुलगी सुरक्षित परत मिळवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पुढील उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक स्थापन करणे.
शाळा, महाविद्यालये, बसस्थानके व गर्दीच्या ठिकाणी नियमित पोलीस गस्त वाढवणे.
रोड रोमिओ व टपोरी मुलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे नोंदविणे.
छेडछाड, स्टॉकिंग व अपहरणाच्या प्रकरणांमध्ये POCSO कायद्यांतर्गत कठोर कारवाई.
त्रिकोळी येथील बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा SIT मार्फत जलद तपास
शाळा-महाविद्यालयांत जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम.
महिला हेल्पलाईन व तक्रार नोंदणीसाठी गोपनीय व्यवस्था
सार्वजनिक ठिकाणी CCTV यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय
फाउंडेशनच्या वतीने असेही नमूद करण्यात आले की, हा प्रश्न केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून समाजाच्या नैतिक व मानसिक आरोग्याशी निगडित आहे. वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
या निवेदनावर सत्यनारायण जाधव, ऍड. अर्चना जाधव, राजू भालेराव, करीम शेख, किशोर औरादे, ऍड. ख्वाजा शेख, धानय्या स्वामी, ज्योती माने, शबाना उडचणे-शेख, किशोर बसगुंडे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, प्रदीप चौधरी, संतोष चव्हाण, बबीता मदने यांसह विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.दरम्यान, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन उमरगा परिसरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

0 Comments