करजखेडा ग्रामपंचायत मध्ये 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीत ४ लाखाचा अपहार ;दोन जनावर गुन्हा दाखल-Karajkheda Grampanchyat Fraud Dharashiv News
धाराशिव (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत करजखेडा येथील १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतील ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नामे सुभाष महादेव कळसुले (रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) व सावंत एम. आर. (रा. टाकळी बे., ता. जि. धाराशिव) यांनी दि. १ जून २०२२ ते १६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ग्रामपंचायत करजखेडा येथे १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीपैकी एकूण ₹४,२०,००० रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादी नामे संजय संतराव ढाकणे (वय ५५ वर्षे), विस्तार अधिकारी, पंचायत समिती धाराशिव, रा. दैत्यकृपा कॉलनी, शाहूनगर, धाराशिव यांनी दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून बेंबळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 409 (विश्वासघात), भारतीय दंड विधान कलम 420 (फसवणूक) व भारतीय दंड विधान कलम 34 (सामूहिक हेतू) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या निधीचा वापर ग्रामविकासाच्या विविध कामांसाठी अपेक्षित असताना त्याचा अपहार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आल्याचे समजते. संबंधित व्यवहारांची कागदपत्रे व आर्थिक नोंदींची पडताळणी सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून, शासन निधीच्या वापराबाबत अधिक पारदर्शकता व जबाबदारीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

0 Comments