सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : साखरपुड्यानंतर चार दिवसांतच नववधू-वराचा मृत्यू-Solapur-Dhule National Highway Accident News
धाराशिव (प्रतिनिधी) – सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोल वेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नववधू-वराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अपघाताची घटना
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील, सध्या वाशी मुक्कामी असलेल्या सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय २३) यांचा गेल्या रविवारी (ता.१५) मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता.
रविवारी अक्षया हिची लातूर येथे महापारेशनची परीक्षा असल्याने ती पहाटे वाशी येथून घरची टाटा नेक्सॉन (क्र. MH 25 BF 5064) या कारमधून निघाली होती. कारमध्ये वर अक्षय शिनगारे आणि चालक अक्षय यादव सिरसट (वय २२) हे देखील होते.
रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला.
या अपघातात नववधू अक्षया चव्हाण आणि वर अक्षय शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक अक्षय यादव सिरसट जखमी झाला आहे.
मदतकार्य व पोलिसांची कारवाई
अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक रुग्णालयात पाठवले. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.
चार दिवसांपूर्वी साखरपुडा, आज दुर्दैवी अंत
साखरपुड्याचा आनंद साजरा करणाऱ्या दोन्ही कुटुंबांवर अवघ्या चार दिवसांत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या घरात अचानक शोककळा पसरल्याने वाशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील वेगमर्यादा व सुरक्षित वाहनचालना याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.


0 Comments