अणदुर येथील झुंजार पत्रकार शिवशंकर (आप्पा) तिरगुळे यांचे दुःखद निधन
निर्भीड लेखणी हरपली… सर्वसामान्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड
बालाघाट न्यूज टाइम्स | विशेष वृत्त
अणदूर पंचक्रोशीसह संपूर्ण परिसरासाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. उपेक्षित, वंचित आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आयुष्यभर झुंज देणारे झुंजार पत्रकार शिवशंकर (आप्पा) तिरगुळे यांचे २२ मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
दै. पुण्यनगरीच्या माध्यमातून आप्पांनी अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांच्या धारदार लेखणीमुळे अनेकांना न्याय मिळाला आणि अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळेच ते केवळ पत्रकार नव्हते, तर सर्वसामान्यांचे खरे लढवय्ये म्हणून ओळखले जात होते. शिवशंकर आप्पा तिरगुळे हे मुळशी अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील, रहिवासी होते मध्यंतरीच्या काळापासून ते अणदुर येथे मुलांचे शिक्षण ,नातेवाईक यामुळे ते अणदूर येथेच स्थायिक झाले होते अल्पावधीमध्ये च त्यांनी पत्रकारिता व सामाजिक कार्याच्यामाध्यमातून माध्यमातून ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत- वेगळी ओळख परिसरात निर्माण केली होती.
चन्नबसव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अणदूर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले. “ट्री बँक” सारखी अभिनव संकल्पना राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. झाडांचे वाढदिवस साजरे करण्याच्या त्यांच्या उपक्रमामुळे पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण झाली आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची प्रेरणा मिळाली.
कोरोना काळ, महापूर किंवा इतर कोणत्याही संकटाच्या वेळी आप्पा नेहमी लोकांच्या मदतीसाठी धावून गेले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी गरजूंना धीर दिला आणि त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक शासकीय व सामाजिक संस्थांनी त्यांना सन्मानित केले.
आप्पा हे एक कर्तव्यदक्ष पुत्र आणि कुटुंबवत्सल व्यक्ती होते. आई-वडिलांची त्यांनी शेवटपर्यंत सेवा केली. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे आणि मुलगी इंजिनिअर होऊन मोठे यश मिळवावे, ही त्यांची स्वप्ने होती. त्यांच्या संस्कारातून ही स्वप्ने नक्की साकार होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांनी अनेक व्यासपीठे गाजवली. जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांचे ते जिवलग मित्र होते, तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ होते. निराधार आणि एकल महिलांसाठी ते भाऊसारखे होते.
त्यांच्या निधनामुळे जय मल्हार पत्रकार संघावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एक धाडसी पत्रकार, संवेदनशील समाजसेवक आणि माणुसकी जपणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 23 रोजी दुपारी अणदूर येथील हाळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवशंकर आप्पा तिरगुळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी ,एक मुलगा, वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने अणदूर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
“जो सर्वांना प्रिय असतो, तोच देवाला प्रिय असतो” — या उक्तीप्रमाणे नियतीने आपल्या लाडक्या आप्पाला हिरावून घेतले आहे.
आज शब्द अपुरे पडत आहेत… डोळे पाणावले आहेत… मन सुन्न झाले आहे…
आप्पा, तुमची निर्भिड लेखणी, तुमचे सामाजिक कार्य आणि तुमचे हसरे व्यक्तिमत्त्व सदैव आमच्या स्मरणात राहील. तुमच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच तुमच्याप्रती खरी श्रद्धांजली ठरेल.
🙏 ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. 🙏
— बालाघाट न्यूज टाइम्स परिवाराकडुन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 💐💐
संपादक -राजगुरु साखरे

0 Comments