लातूर–तुळजापूर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात : एकाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : लातूर–तुळजापूर महामार्गावर रविवारी दि,१५ रोजी दुपारी भीषण तिहेरी अपघात होऊन एका जणाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा–करजखेडा परिसरात घडला. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच–४५ एझेड ५४४९ क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने प्रथम पुढे असलेल्या वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडीने रस्त्यावरील कटडा तोडला आणि समोरून तुळजापूरकडे येत असलेल्या होंडा सिटी कारला समोरासमोर जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत होंडा सिटी कारचे मोठे नुकसान झाले. अपघातात कारमधील जीवन वसंत पाटील (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नित्यानंद मोहन बुके (वय ३५), मोहन बुके (वय ५५), अर्जुन पटुळे (वय ५५) आणि एक अनोळखी पुरुष (अंदाजे वय ४०) असे चार जण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे हलविण्यात आले.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही काळ घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातामुळे तुळजापूर–लातूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
दरम्यान, बोलेरो चालकाने मद्यपान केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस ठाणे करत आहेत. या घटनेमुळे पाटोदा–करजखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..



0 Comments