धाराशिव: खरीप २०२६पूर्वी कृषि विभागाची धडक मोहीम; १५ कृषि सेवा केंद्रांवर कारवाई
प्रतिकात्मक फोटो
धाराशिव जिल्ह्यात अनियमिततेवर कारवाईचा बडगा – १ परवाना रद्द, १४ निलंबित
खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रांवर मोठी धडक कारवाई केली आहे. नियमित तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आल्याने एकूण १५ कृषि सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १ केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून १४ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तपासणीत उघड झालेल्या गंभीर त्रुटी
कृषि विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यामध्ये:
- ई-पॉस मशीननुसार साठा न जुळणे
- परवान्यात नमूद नसलेल्या स्रोतांमधून खरेदी-विक्री
- साठा रजिस्टरमध्ये नोंदींचा अभाव
- शेतकऱ्यांना योग्य नमुन्यात पावती न देणे
- खरेदीची बिले उपलब्ध नसणे
- अनुदानित खत विक्रीचे अभिलेख अपूर्ण असणे
या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
तालुकानिहाय कारवाई
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली:
- धाराशिव – १
- तुळजापूर – १
- उमरगा – ४
- भूम – ३
- परंडा – २
- कळंब – २
- वाशी – २
एकूण: १५ कृषि सेवा केंद्रे
पुढेही मोहीम सुरूच
कृषि विभागाने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे, खते आणि किटकनाशके कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. जादा दराने विक्री, लिंकिंग, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, दरफलक न लावणे किंवा इतर नियमबाह्य व्यवहार आढळल्यास कडक पावले उचलली जातील.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आवाहन
कृषि विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:
- फक्त अधिकृत परवानाधारक केंद्रातूनच खरेदी करा
- खरेदीवेळी पक्की पावती घ्या
- पावतीवर सर्व तपशील व विक्रेत्याची स्वाक्षरी तपासा
- अनुदानित खतासाठी ई-पॉस बिल घ्या
- बॅगवरील किंमत तपासा
- बियाण्यांचे टॅग, पिशवी व नमुने हंगाम संपेपर्यंत जतन ठेवा
या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट व नियमबाह्य व्यवहारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments