धाराशिवमध्ये जात पंचायतचा धक्कादायक प्रकार; महिलेसह मुलाला मारहाण करून ₹60 हजारांची खंडणी उकळली-Dharashiv Crime
देवाच्या कार्यक्रमावरून वाद; जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने पैसे उकळले
धाराशिव (प्रतिनिधी):
धाराशिव शहरात जात पंचायतच्या नावाखाली महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला मारहाण करून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायत्री शाम चव्हाण (वय 35, रा. जुना बसडेपो, दुध डेअरी पाठीमागे, धाराशिव) या आपल्या मुलासह राहत आहेत. दि. 6 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास आरोपी सागरबाई जगु पवार, ज्योती ज्योतीराम पवार, ज्योतीराम जगु पवार आणि प्रियंका गणेश पवार (सर्व रा. जुना बसडेपो परिसर, सध्या पंचनगर, घाटकोपर, मुंबई) यांनी फिर्यादीला अडवले.
"तुझा मुलगा आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवला, त्यामुळे आमच्यावर देवाचा कोप झाला आणि आमच्या मुलाचा अपघात झाला," असा अंधश्रद्धेवर आधारित आरोप करत आरोपींनी फिर्यादी व तिच्या मुलाला जबरदस्तीने लक्ष्मी पारधी पिडी, तेरखेडा येथे नेले.
तेथे जात पंचायत बसवून फिर्यादी व तिच्या मुलाला शिवीगाळ करत चप्पलने मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना दोषी ठरवत तब्बल ₹2,55,000 दंड ठोठावण्यात आला. त्यातील तात्काळ ₹60,000 रुपये न दिल्यास उचलून नेऊन जीव मारण्याची धमकी देण्यात आली. भीतीपोटी फिर्यादीकडून आरोपींनी जबरदस्तीने ₹60,000 रुपये उकळले.
या घटनेनंतर फिर्यादी गायत्री चव्हाण यांनी दि. 20 एप्रिल 2026 रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 308(2), 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच जात पंचायत अधिनियमातील कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
🔴 पुढील तपास सुरू:
या प्रकरणाचा अधिक तपास धाराशिव शहर पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अंधश्रद्धा आणि जात पंचायतच्या नावाखाली होणाऱ्या अशा प्रकारांविरोधात संताप व्यक्त होत आहे.

0 Comments