धाराशिव हादरले: घरभाड्याच्या वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला; कोयत्याने मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल -Dharashiv Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव हादरले: घरभाड्याच्या वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला; कोयत्याने मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल -Dharashiv Crime News

धाराशिव हादरले: घरभाड्याच्या वादातून  वृद्धावर जीवघेणा हल्ला; कोयत्याने मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल -Dharashiv Crime News 


धाराशिव/प्रतिनिधी  : शहरात घरभाड्याच्या वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भाडे मागितल्याच्या कारणावरून भाडेकरूने घरमालकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर तब्बल 26 टाके घालावे लागले आहेत. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या घटनेबाबत पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, राजाभाऊ शिवाय्या स्वामी यांच्या जागेत राजेश अनिल झोंबाडे हा भाड्याने राहत होता. मागील दोन महिन्यांपासून झोंबाडे याने घरभाडे दिले नव्हते. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी भाडे देण्याबाबत पुन्हा वाद निर्माण झाला. "भाडे द्या, अन्यथा जागा खाली करा" असे स्वामी यांनी सांगितल्यावर वाद अधिक चिघळला.

दरम्यान, किरकोळ वादातून सुरू झालेली शाब्दिक चकमक अचानक हिंसक वळणावर गेली. रागाच्या भरात आरोपी झोंबाडे याने लोखंडी कोयता उचलून राजाभाऊ स्वामी यांच्या डोक्यावर व पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात स्वामी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या शरीरावर 26 टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. (BNS) कलम 109, 352, 351(2) तसेच शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 4 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी राजेश झोंबाडे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शहाजी ओहोळ करीत आहेत. शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments