हृदयद्रावक घटना: कौटुंबिक वादातून २२ वर्षीय विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या- औसा तालुक्यातील घटना-Latur News
लातूर (ता. औसा) प्रतिनिधी :
खरोसा गावात रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी व हृदय पिळवटून टाकणारी घटना दि,२०रोजी उघडकीस आली. किरकोळ कौटुंबिक वादातून त्रस्त झालेल्या २२ वर्षीय विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत निकिता दीपक भुरे (वय २२, रा. खरोसा) हिने रविवारी रात्री कौटुंबिक वादातून मानसिक ताण सहन न झाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. तिने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना—शिवानी आणि शिवांश—सोबत घेत गावा जवळील विहिरीत उडी मारली. या घटनेत तिन्ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून रात्री उशिरा तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी मनोज भरत भुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हे कारण असल्याचे समोर येत असले, तरी नेमके कारण काय होते याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे खरोसा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नातेवाईक, शेजारी आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

0 Comments