चिवरी-नळदुर्ग बससेवा सुरू ; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावातून अनेक वर्षांपासून बससेवा बंद असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केल्याने अखेर चिवरी ते नळदुर्ग बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
दि. १३ रोजी चिवरी येथे या बससेवेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी बसचे स्वागत करून चालक व वाहकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजसाठी तसेच नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बससेवा बंद असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च दोन्ही वाढत होते. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी डेपो मॅनेजर यांच्याशी सातत्याने संपर्क साधून बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने चिवरी ते नळदुर्ग ही बससेवा आता नियमित सुरू झाली आहे.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस साहेबराव घुगे, पंचायत समिती सदस्य प्रवीण भोसले, नळदुर्ग ग्रामीण मंडळ अध्यक्षा रंजना राठोड, उपसभापती निलगिरे यांच्यासह ग्रामस्थ, तरुण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रखडलेली बससेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.




0 Comments