सामायिक बोरवेलच्या वादातून सख्या भावाची निर्घृण हत्या- तुळजापूर तालुक्यातील घटना-Naldurg Police Station Crime News
कारला येथे लोखंडी पाईप व काठ्यांनी बेदम मारहाण; मुलगाही गंभीर जखमी, चौघांवर खुनाचा गुन्हा
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील कारला येथे सामायिक बोरवेलमधील मोटार काढून घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्या भावाने व पुतण्यांनी मिळून एका व्यक्तीची लोखंडी पाईप व काठ्यांनी मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 21 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्राणघातक हल्ल्यात मयताचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश ब्रह्मदेव मोटे (वय 25) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे वडील ब्रह्मदेव मोटे यांची त्यांचे भाऊ गौतम मोटे व विष्णू मोटे यांच्यासोबत वडिलोपार्जित शेती आहे. या शेतामध्ये सामायिक बोरवेल असून पाणी देण्यासाठी पाळ्या ठरलेल्या होत्या. मात्र, बोरवेल तसेच शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असल्याचे समोर आले आहे.
फिर्यादीनुसार, 13 मे 2026 रोजी महेश मोटे व त्यांचे आई-वडील लातूर येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. ते परत आल्यानंतर चुलते विष्णू मोटे व चुलत भाऊ योगेश यांनी सामायिक बोरवेलमधील मोटार परस्पर काढून घेतल्याचे त्यांना समजले.
यानंतर 21 मे रोजी सायंकाळी ब्रह्मदेव मोटे हे मोटार काढल्याचा जाब विचारण्यासाठी विष्णू मोटे यांच्या घरी गेले असता वाद निर्माण झाला. त्यावेळी विष्णू ब्रह्मदेव मोटे, गौतम बब्रुवान मोटे, योगेश गौतम मोटे व मनोज गौतम मोटे (सर्व रा. कारला, ता. तुळजापूर) यांनी ब्रह्मदेव मोटे यांना लोखंडी पाईप व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
यामध्ये विष्णू मोटे यांनी लोखंडी पाईपने ब्रह्मदेव यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतरही आरोपींनी त्यांच्या छातीवर, पोटावर व डोक्यावर लोखंडी पाईपने मारहाण सुरूच ठेवली. या गंभीर मारहाणीत ब्रह्मदेव मोटे यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या महेश मोटे यांच्यावरही आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. विष्णू मोटे यांनी कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकवताना महेश यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच इतर आरोपींनी त्यांनाही लोखंडी पाईपने मारहाण केली. मध्ये पडलेल्या त्यांच्या आई, पत्नी तसेच बहीण पूनम व पूजा यांना धक्काबुक्की करण्यात आली.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महेश मोटे यांच्या फिर्यादीवरून 22 मे 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109, 115(2) व 3(5) अंतर्गत चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष दत्तात्रय गिते करीत आहेत.

0 Comments