ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उमरग्यात ‘स्वच्छ, सुंदर, हरीत उमरगा’ महाअभियानाला सुरुवात; पहिल्याच दिवशी १० पोती कचरा संकलित, नगर परिषदेसमोर ‘गांधीगिरी’-Umerga News
नगर परिषदेकडे लेखी तक्रारी; कार्यवाही न झाल्यास भव्य मोर्चाचा इशारा — काळे प्लॉटमध्ये ५० महिलांनी मांडल्या नागरी समस्या
उमरगा : शहरातील अस्वच्छता, कचरा व्यवस्थापन, तुंबलेले नाले, डुकरे आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव यासह विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने “स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरीत उमरगा” या महाअभियानाला स्वातंत्र्यदिनी सुरुवात करण्यात आली. दि. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून, पहिल्याच दिवशी श्रमदानातून सुमारे १० पोती कचरा संकलित करण्यात आला. त्यानंतर हा कचरा नगर परिषदेसमोर ठेवून त्याला हार घालत अनोख्या पद्धतीने ‘गांधीगिरी’ करण्यात आली.
अभियानाच्या सुरुवातीला फाउंडेशनच्या कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय जाधव, धम्मचारी प्रज्ञाजीत आणि ॲड. शीतल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थी, युवक, महिला आणि स्वयंसेवकांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक हाती घेऊन घोषणाबाजी करत बालाजी मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर, हमीद नगर आणि डॉ. गणेश नगर परिसरात श्रमदान केले.
या श्रमदानादरम्यान विविध ठिकाणी उघड्यावर पडलेला जवळपास १० पोती कचरा गोळा करण्यात आला. नागरिकांशी संवाद साधताना नियमित कचरा संकलन होत नसल्याने उघड्यावर कचरा टाकण्याची वेळ येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तसेच नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने तुंबलेल्या नाल्यांतील सांडपाणी घरांच्या भिंतीलगत साचत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नाल्यांतून काढलेली घाण वेळेवर उचलली जात नसल्याने डुकरे, मोकाट कुत्रे आणि पावसाचे पाणी यामुळे पुन्हा कचरा नाल्यांमध्ये जात असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर श्रमदानातून जमा केलेला कचरा नगर परिषदेसमोर ठेवून त्याला हार घालत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक गांधीगिरी केली.
काळे प्लॉटमध्ये ५० महिलांनी मांडल्या समस्या
महाअभियानाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी काळे प्लॉट परिसरात पाहणी दौरा केला. यावेळी घरोघरी पत्रके वाटून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या परिसरातही नियमित कचरा गाडी येत नसणे, नाल्यांची साफसफाई न होणे, डुकरे आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव यासह विविध समस्या नागरिकांनी मांडल्या.
विशेष म्हणजे, काळे प्लॉट परिसरातील जवळपास ५० महिलांनी स्वतः पुढाकार घेत फाउंडेशनच्या प्रतिनिधींसोबत मौलाना आझाद चौक ते काळे प्लॉट हा रस्ता पायी चालत पाहणी केली आणि रस्त्याची तसेच नाल्याची गंभीर अवस्था प्रत्यक्ष दाखवून दिली.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, पादचारी, दुचाकीस्वार तसेच दररोज शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता धोकादायक बनल्याचे महिलांनी सांगितले.
तुंबलेल्या नाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती
रस्त्यालगतचा नाला मोठ्या प्रमाणावर तुंबलेला असून त्यामध्ये घाण व सांडपाणी साचल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. नाल्यातील दूषित पाणी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या व्हॉल्व्हपर्यंत येत असल्याचेही निदर्शनास आल्याचे फाउंडेशनने सांगितले.
मोठा पाऊस झाल्यास तुंबलेल्या नाल्याचे पाणी रस्त्यावर तसेच लगतच्या घरांमध्ये शिरते. नाल्याची खोली आणि सद्यस्थिती पाहता एखादी व्यक्ती अथवा लहान मूल त्यात पडल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका दुर्गाताई धोत्रे यांनी फाउंडेशनच्या प्रतिनिधींना घरी बोलावून संवाद साधला. तसेच फाउंडेशनच्या वाचनालयासाठी काही पुस्तके भेट दिली.
‘दहा दिवसांत उमरगा वराहमुक्त’ आश्वासनाचा मुद्दा चर्चेत
उमरगा शहरातील डुकरांच्या प्रश्नावरही पाहणीदरम्यान नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्षांनी उमरगा शहर दहा दिवसांत वराहमुक्त करण्याचे आश्वासन दिल्याची बातमी दि. ९ जुलै २०२६ रोजी दैनिक ‘लोकमत’च्या ‘हॅलो धाराशिव’ पुरवणीत प्रसिद्ध झाली होती. मात्र त्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही शहरातील अनेक भागांमध्ये डुकरांचा उपद्रव कायम असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
निवडणुकीपूर्वी तसेच निवडून आल्यानंतर दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
१७ ऑगस्टला नगर परिषदेला लेखी निवेदन
महाअभियानाच्या दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी झालेल्या पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व समस्यांची ठिकाणनिहाय माहिती सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी नगर परिषदेला लेखी स्वरूपात देण्यात येणार आहे.
त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्यास महाअभियानाचाच भाग म्हणून नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील समस्यांचे निराकरण होईपर्यंत लेखी पाठपुरावा, जनजागृती, गांधीगिरी आणि इतर शांततामय लोकशाही मार्गांचा अवलंब करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
अभियानात नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, मात्र नियमित कचरा संकलन, नाल्यांची स्वच्छता, सुरक्षित रस्ते तसेच डुकरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही नगर परिषदेची मूलभूत जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या अभियानात शांताबाई चव्हाण, ॲड. शीतल चव्हाण, धम्मचारी प्रज्ञाजीत, विजय जाधव, प्रा. राजू बटगिरे, ॲड. अर्चना जाधव, ॲड. फिरोज मुल्ला, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, इरान्ना बसगुंडे, राम लोहार, प्रदीप चौधरी, करिम शेख, किशोर बसगुंडे, ज्योती माने, मयूर कटके, विजय चितली, सिद्राम जमादार, नागेश चलकुरे यांच्यासह बहुजन हिताय वसतिगृहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सायंकाळच्या पाहणी दौऱ्यात ॲड. शीतल चव्हाण, प्रा. राजू बटगिरे, राजू भालेराव, ॲड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, मयूर कटके, किशोर बसगुंडे, नागेश चलकुरे, रागिनी शानेदिवाण यांच्यासह काळे प्लॉट परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments