चिवरीतील माजी सैनिक संभाजी काळजाते यांना गणेश मंडळांकडून आरतीचा मान; विविध मंडळांतर्फे सन्मान
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक तथा सैनिक फेडरेशन, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष संभाजी काळजाते यांना गणेशोत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांकडून आरतीचा मान देऊन सन्मान करण्यात आला.
वडगाव देव येथील श्री शिव तरुण गणेश मंडळ व जय मल्हार तरुण मंडळ, गंधोरा येथील गणेश मंडळ तसेच चिवरी येथील बसवेश्वर नगर गणेश मंडळाच्या वतीने माजी सैनिक संभाजी काळजाते यांना आरतीचा मान देण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, पुष्पहार आदींनी सन्मान करून देशसेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत माजी सैनिक संभाजी काळजाते यांनीही संबंधित गणेश मंडळांना वर्गणीच्या माध्यमातून भरघोस आर्थिक मदत केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
देशसेवेत योगदान दिलेल्या माजी सैनिकांचा गणेश मंडळांकडून आरतीचा मान देऊन गौरव करण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला. या माध्यमातून माजी सैनिकांप्रती आदर आणि तरुण पिढीमध्ये देशसेवेची भावना वृद्धिंगत होत असल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सन्मानामुळे माजी सैनिक संभाजी काळजाते यांनीही मंडळांच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले.




0 Comments