Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत निवडणूक मोर्चेबांधणीला गावोगावी जोर, गुप्त बैठकांना वेग भावी सरपंच पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच


तुळजापूर/राजगुरु साखरे : सध्या जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला गावोगावी वेग आला आहे, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात होणार आहे. त्यामुळे दर वेळेच्या पारंपारिक प्रचार प्रणालीपेक्षा आता सोशल मीडियाचा प्रचार प्रणालीसाठी मोठा वापर होणार आहे. अत्यल्प काळात जास्तीत जास्त मतदार राजांपर्यंत पोहोचण्याची प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडिया उपयुक्त ठरणार आहे. सरपंच पद थेट जनतेतून असल्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक दिसत आहे, त्यामुळे गुलाबी थंडीतही ग्रामीण भागातील गावागावांमध्ये राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरपंच पदाच्या इच्छुक उमेदवाराने आपापल्या प्रभागात उमेदवार चाचपणीला सुरुवात केली असून पॅनल तयार करण्यामध्ये व्यस्त आहेत. रात्री उशिरापर्यंत गावागावांमध्ये गुप्त बैठकांना जोर आला आहे. ग्रामपंचायत ची निवडणूक ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य ही या निवडणुकीत लक्ष घालत आहेत. प्रत्येक गावामध्ये आपल्याच राजकीय पक्षाच्या पॅनलचे वर्चस्व असावे . यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार ही प्रयत्न करत आहेत मात्र पॅनल प्रमुखही  स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांनाच पॅनल मध्ये जागा देत आहेत, त्यामुळे पॅनल प्रमुखाला सुद्धा स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार निवडताना कसरत करावी लागत आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून पारावर आणि चावडीवर बैठकींना  उत येत आहे, सध्या फक्त पारावर गावोगावी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पा रंगताहेत .भावी सरपंच कोण असणार? निवडून दिले तर गावचा विकास करणार का ? अजून गावची अवस्था जैसे थे  राहणार? अशा एक ना अनेक विषय चौका चौकामध्ये रंगू लागली आहेत. सध्या निवडणुकीत कोणत्या गटाचे पारडे भारी आणि कोणत्या गटाला कोणाचा पाठिंबा मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या काळात कोणाला सरपंच पदाचा गुलाल लागणार आणि पराभवाचा झटका कोणाला सहन करावा लागणार  याची जोरदार चर्चा गाव गाड्यांमध्ये होताना दिसत आहे.


Post a Comment

0 Comments