![]() |
श्री क्षेत्र मैलापुर येथे श्री खंडोबा यात्रेसाठी दाखल झालेले लाखो भाविक |
नळदुर्ग: खोबरं भंडाऱ्यांची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेञ मैलारपूर येथील श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. येथील श्री खंडोबाच्या यात्रेस शुक्रवार दि,६ पासून सुरुवात झाली होती. शुक्रवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या, महामार्गापासून मंदिराकडे येणाऱ्या सर्व मार्गाने रस्त्यावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. शुक्रवारी मैलारपूर नगरी भाविकांनी गजबजून गेली होती. हलगीच्या वाद्यात खोबरं बेल भंडाऱ्याची उधळण करीत काठ्या व नंदी ध्वजाचे श्री क्षेत्र मैलारपूरात आगमन होत होते. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांनी नैवेद्य, महापूजा, वारू जेवु घालणे,पट बांधणे,जावळ काढणे लंगर तोडणे देवाला दंडवत घालणे,आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच मध्यरात्री बारा वाजता नळदुर्गच्या मानाच्या काठ्या व नंदी ध्वजाचे तर अणदुरच्या छबिन्याच्या दोन अश्वांचे मोठ्या आतिषबाजीमध्ये आगमन झाले. यानंतर अणदूर नळदुर्ग येथील मानकऱ्यांचा फेटा बांधून मानपान सोहळा पार पडला. दिवसभर हलगीच्या तालावर वाघ्या मुरळीचा नाच, व अंगावर आसूड ओढून घेत असल्याने भाविकांचे याकडे लक्ष वेधले होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथील श्री खंडोबाची यात्रा रद्द केली होती, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवल्यामुळे भाविकांनी मोठ्या उत्साहात यात्रेसाठी हजेरी लावली होती.
यात्रेकरूंसाठी नळदृग पोलीस ठाणे, नगरपालिका, मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसुविधीसाठी चोख नियोजन करण्यात आले होते. शनिवारी दि,७ रोजी जंगी कुस्त्याचा स्पर्धा होऊन यात्रेची सांगता झाली. यामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी विजय मिळवला.
0 Comments