उस्मानाबाद तालुक्यातील ७०१४५ शिधापत्रिका लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण.
३० लाख ९२ हजार ८५० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट वर्ग.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद दि.२४ - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत रास्त भाव दुकानामार्फत केशरी शिधापत्रिकाधारक महिला कुटूंब प्रमुखाच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांचे सीडिंग करण्यात येत असून त्या खात्यांमध्ये थेट प्रती लाभार्थी १५० रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात येत आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ७० हजार २४८ शिधापत्रिकाधारक महिला कुटूंब प्रमुखापैकी ७० हजार १४५ शिधापत्रिकाधारकांचे बँक खात्यांशी संलग्न सीडिंग केले असून उर्वरित फक्त १०३ शिधापत्रिकाधारकांची सीडिंग करणे बाकी आहे.
केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारीपासून अन्नधान्याऐवजी प्रती महिना प्रती लाभार्थी १५० रुपये रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम कुटुंबातील महीला प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीएफएमएस प्रणाली आधारे थेट जमा करण्यात येत आहे.
तर आजपर्यंत उस्मानाबाद तालुक्यातील एकूण १ हजार ५३२ शिधापत्रिकांमधील ६ हजार ८७३ लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी प्रती महिना १५० रुपयांप्रमाणे एकूण ३० लाख ९२ हजार ८५० रुपये पीएफएमएफ प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात (जानेवारी ते मार्च) जमा करण्यात आले आहेत. तर १ हजार २३ शिधापत्रिकांमधील ४ हजार ४८५ लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी प्रती महिना १५० रुपये प्रमाणे एकूण २० लाख ९८ हजार २५० रुपये रक्कमेचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. तर उर्वरीत रक्कम लवकरच पात्र शिधापत्रिकाधारकांधारक महीला कुटूंब धारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. तालुक्यामध्ये ७० हजार २४८ शिधापत्रिकांमधील ३ लाख १५ हजार ३८४ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांपैकी ३ लाख १५ हजार २८१ लाभार्थ्यांची आधार सीडिंग पूर्ण करण्यात आली असून केवळ १०३ लाभार्थ्यांची आधार सीडिंग करणे बाकी आहे.
त्यामुळे आधार सीडिंग प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या रास्त भाव दुकानदार यांच्याद्वारे तात्काळ आधार सीडिंग करून घ्यावेत. तसेच विविध कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. दि.५ जून रोजी घेण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात १०८ दुय्यम शिधापत्रिका तर ३ नवीन शिधापत्रिका व १२ महात्मा ज्योतिबा फुले प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. तर दि.१३ जून रोजी तालुक्यातील सुंभा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ४५ दुय्यम व २ नवीन शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत.
हे काम जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे व नायब तहसिलदार तथा उस्मानाबाद तालुका पुरवठा अधिकारी राजाराम केलुरकर हे करीत असून सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार सीडिंग करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
0 Comments