साप्ताहिकांना दैनिका समवेत जाहिराती देण्याची व्हाईस ऑफ मीडियाची मागणी.
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या वतीने दैनिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये छोट्या वृत्तपत्रांना सातत्याने वगळण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून वृत्तपत्रावर अन्याय कारक धोरण अवलंबिवली असल्यामुळे सर्व साप्ताहिकांना नियमित जाहिराती देण्यात याव्यात, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हा माहिती अधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्र्याकडे केले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या सर्व निर्णयाची प्रसिद्धी साप्ताहिक वृत्तपत्र सातत्याने करत असून ग्रामीण भागातल्या समस्यांचे वार्तांकन देखील छोटी वृत्तपत्रे करतात.
शासनाच्यावतीने ज्यावेळी जाहिराती देण्यात येतात. त्यावेळी साप्ताहिक वृत्तपत्राला कायम डावलण्यात येते अथवा जाहिरातीचा आकार एकदम कमी करून साप्ताहिकांची बोळवण केली जाते. ही अतिशय दुर्देवी बाब असल्याचे मत राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्र संपादकांचे झालेले आहे. वृत्तपत्र हे स्वातंत्र्य चळवळीपासून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहून सामाजिक परिवर्तनाचे काम सक्षमपणे करीत आलेली आहेत. मात्र आजच्या डिजिटल युगात साप्ताहिक वृत्तपत्र चालविणे अतिशय जिकरीचे झालेले आहे.
तसेच शासन परिपत्रक (जीआर) प्रमाणे प्रत्येक दैनिकांसोबत प्रत्येक साप्ताहिकाला जाहिरात देण्याच्या नियमाला धरून आमची हक्काची जाहिरात देण्यात अशी मागणी केली आहे. यावर व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, कार्याध्यक्ष राजेश बिराजदार, उपाध्यक्ष जफर शेख, श्रीकृष्ण विष्णू लोमटे, महेबूब पठाण, राजकुमार गंगावणे, ज्योतीराम निमसे आदींच्या सह्या आहेत.
0 Comments