शहरातील भुमीगत गटारीचे बंद असलेले काम तात्काळ सुरु करा अन्यथा नगर परिषद कार्यालयात चिखलफेक आंदोलन,शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांचा इशारा
धाराशिव-शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. परिणामी रस्त्यावर चिखल होऊन नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. लहान मुले, दुचाकीस्वार घसरुन पडत असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी अन्यथा नगर परिषद कार्यालयात चिखलफेक आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक चारमधील भूमिगत गटारीच्या कामामुळे सर्व रस्ते उखडले गेले आहेत. काळी माती वर आल्यामुळे नारायण कॉलनी, गालीब नगर, शिरीन कॉलनी, निजामोद्दिन कॉलनी, रझा कॉलनी, सुलतानपुरा, शाहूनगर, संभाजीनगर, वृंदावन कॉलनी या भागातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यावर चालताना महिला लहान मुले, दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवित आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. सदर भागात मुरूम टाकून दबाईचे काम नगर परिषदेने गुत्तेदारास दिले होते, परंतु राजकीय हस्तक्षेपाने प्रेरित होउन येथील नगरसेवकाने सदर काम अडवणूक केल्यामुळे सदरचे मुरूम टाकण्याचे काम बंद झाले असून ते तात्काळ चालू करून रोलरने रस्ता दाबून द्यावा व नागरिकांचे जनतेचे चिखलातून जाण्याची नामुष्की बंद करावी. अन्यथा नगर परिषद कार्यालयात चिखलफेक आंदोलन करण्यात येईल असे श्री.साळुंके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
0 Comments