हृदयात राम व हाताला काम हेच आमचे हिंदुत्व खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे मत
कळंब दि,११ : देशातील तरुण बेरोजगार असुन केंदातील निष्क्रीय सरकार रोजगार देण्याबाबत आश्वासनाची पुर्तता करत नाही, म्हणुनच शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने बेरोजगारांचे मेळावे भरवुन रोजगार देण्याचे काम शिवसेना करत असल्याचे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. कळंब येथील रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. हिंदुत्वाची व्याख्या आमच्यादृष्टीने ह्रदयात राम व हाताला काम अशी असुन त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करत असल्याचा घणाघातही खासदार ओमराजे निंबाळकर यानी यावेळी केला.
धाराशिव फाऊंडेशन व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे )वतीने कळंब येथील साई मंगल कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन (ता.११) रोजी केले होते. तालुक्यासह जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या पुढाकाराने नोकरी महोत्सव आयोजित केला. महोत्सवात महाराष्ट्रातील 35 कंपन्यांमार्फत बेरोजगार युवक, युवतीची पात्रतेनुसार निवड करण्यात आली आहे. तब्बल एक हजार 628 युवक युवतीनी नोंदणी केली. त्यापैकी एक हजार 432 जणांनी सहभाग नोंदवला व 416 जणांना तात्काळ नोकरीचा लाभ देण्यात आला आहे. अनेकांना लाभ मिळाल्याने शिवसेनेचा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. नोकरी मिळाली नसली तरी युवक, युवतींना जॉब कार्डचे वितरण केले असुन काही ऑफलाईन उमेदवार आले होते. त्यानाही जॉब कार्ड देण्यात आले आहेत. जॉब कार्डमुळे विद्यार्थ्यांना सर्व जाहीरीतीची माहिती संदेशाद्वारे मोबाईलवर मिळणार आहे. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, जिल्हा संघटक दिलीप पाटील, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
राजेनिंबाळकर म्हणाले की, सध्याचे सरकार कोणत्या प्रकारे काम करत आहे हे पाहुन तरुणांनी त्यांच्याकडुन आशा करणे देखील सोडुन दिले आहे. पण हे बदलायची शक्ती देखील तुमच्यासारख्या तरुणांत आहे. लोकप्रतिनिधी चांगले काम करत नसतील तर त्यांना मताच्या रुपाने बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे. आपल्याच जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या लातुरच्या प्रगतीचे गोडवे गाताना आपला जिल्हा कुठे गेला याकडे आपण सर्वांनीच सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याची खंत राजेनिंबाळकर यानी व्यक्त केली. तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे अशी भुमिका आपली असल्याचेही त्यानी सांगितले.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, सरकारी नोकऱ्या शिल्लकच राहिल्या नसल्याने किमान खाजगी कंपनीत तर नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शिवसेनेकडुन हा उपक्रम हाती घेतला. दरवर्षी अशाच प्रकारे रोजगार मेळावे आयोजीत करुन अधिकाधिक कंपनीना आपल्या भागात आमंत्रित करुन रोजगारांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले. जिल्ह्यात मोठ्या कंपन्या येत नसल्याची ओरड होते, पण त्यासाठी प्रयत्न न केल्यानेच ही अवस्था निर्माण झाली आहे. पुढील काळात जनतेच्या आर्शिवादाने हे सरकार उलथवुन टाकुन हे चित्र बदलण्यासाठी आम्ही सगळे जीवाचे रान करु असे आश्वासन आमदार पाटील यानी दिले.
- यंदा बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट
0 Comments