आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गायकवाड यांनी केले सुनील काळे यांचे कौतुक पारधी समाजाच्या घरकुल व विविध प्रमाणपत्रांसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करणार- गायकवाड.
धाराशिव: सध्याच्या काळात गणेशोत्सवाला नाचणे, कानठळ्या बसविणार्या आवाजातील गाणी असे स्वरूप आलेले आहे. त्याला छेद देऊन धाराशिव येथील आदिवासी पारधी तरूण गणेश मंडळाने शासन आपल्या दारी योजनेची जनजागृती करून वेगळा संदेश दिला आहे. आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा मंडळाचे मार्गदर्शक सुनील काळे यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. गुरूवारी (दि.21) मंडळाच्या गणरायाचे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्या हस्ते आरतीपूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे हे आदिवासी पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सवात देखील देखावा आणि इतर खर्चाला फाटा देऊन त्यांनी पारधी समाजाला शासनामार्फत मिळणार्या योजना तसेच शासन आपल्या दारी योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती केली आहे. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत आदिवासी पारधी बांधवांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार नाव नोंदणी, आधार नोंदणी तसेच निराधार योजनेचा लाभ याविषयी माहिती देणारे फलक मंडळाच्या वतीने लावण्यात आले आहेत.
गुरूवारी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी धाराशिव येथे आल्यानंतर आवर्जुन जय अंबे तरुण गणेश मंडळाच्या या उपक्रमाला भेट देऊन पाहणी केली. गणेशोत्सव काळात शासनाच्या योजनांची जनजागृती करणार्या या उपक्रमाबद्दल मंडळाचे मार्गदर्शक सुनील काळे यांचे कौतुक केले. आदिवासी पारधी समाजाला शासनाकडून मिळणारे लाभ, शबरी घरकुल व इतर योजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पारधी समाजाच्या घरकुल व विविध योजनेसाठी लागणारी जागा, तसेच त्याकरिता लागणारे सर्व प्रकारचे प्रमाणपत्र यासाठी आपण स्वतः जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पारधी बांधवांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी मंडळाने प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीची आरती व पूजन श्री.गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक बापू पवार, गणेश मंडळाचे पदाधिकारी रोहीत काळे, अरूण काळे, दत्ता चव्हाण, नाना पवार, दिलीप चव्हाण, दादा पवार, विजय पवार, देवराव पवार, कालीदास पवार, सुशांत काळे तसेच आदिवासी पारधी महिला, पुरूष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments